म्युकरमायकोसिसचे रुग्णही होत आहेत बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:08 AM2021-05-19T04:08:20+5:302021-05-19T04:08:20+5:30

नागपूर : ६५ वर्षीय आईला फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची लागण झाली. हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या उपचाराने ती बरी झाली. परंतु काही ...

Patients with myocardial infarction are also recovering | म्युकरमायकोसिसचे रुग्णही होत आहेत बरे

म्युकरमायकोसिसचे रुग्णही होत आहेत बरे

Next

नागपूर : ६५ वर्षीय आईला फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची लागण झाली. हॉस्पिटलमध्ये सहा दिवसाच्या उपचाराने ती बरी झाली. परंतु काही दिवसातच दाताचे दुखणे वाढले. डॉक्टरांनी तपासले असता म्युकरमायकोसिसची शंका उपस्थित केली. डॉक्टरांनी तातडीने नागपूरच्या शासकीय दंत रुग्णालयात जाण्यास सांगितले. अमरावतीवरून नागपूर गाठल्यावर रुग्णालयाचे मुख शल्य चिकित्सक डॉ. अभय दातारकर यांनी तपासले. म्युकरमायकोसिस असल्याचे निदान करीत शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. आमच्याकडून होकार येताच त्यांनी आईचा वरचा जबड्याचा काही भाग काढला. आज दीड महिन्याचा कालावधी होत आहे. आई या आजारातून बरी झाल्याचे समाधान आहे. लवकर निदान झाल्याने हे शक्य झाल्याचे त्यांचा मुलगा अतुल भुसारी यांनी आपली भावना ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

कोरोना विषाणूवर यशस्वी उपचारानंतर म्युकरमायकोसिससारख्या आजाराची गुंतागुंत वाढत असल्याने आरोग्य क्षेत्रात चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसिस हे ‘फंगल इन्फेक्शन’ आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमधील अनियंत्रित मधुमेह व स्टेराॅईडचा अधिक डोस घेणाऱ्यांमध्ये हा आजार वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पूर्वी वर्षातून एखाददुसरा म्युकरमायकोसिसचा रुग्ण आढळायचा. परंतु आता आठवड्याला जवळपास २० ते २५ रुग्णांची नोंद होत आहे. धक्कादायक म्हणजे, मागील चार महिन्यात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांची नोंद झाली. यातील १३ रुग्णांवर रुग्णालयाच्या ‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ विभागाने यशस्वी शस्त्रक्रिया केली. यातील साधारण १० रुग्ण बरे झाले आहेत. यातीलच एका रुग्णाच्या नातेवाईकाने आपल्या आईचे उदाहरण देऊन ‘म्युकरमायकोसिस’ला घाबरू नका, तातडीने उपचार करण्याचे आवाहन केले.

- ७७ टक्के रुग्ण बरे झाले

शासकीय दंत रुग्णालयाच्या ‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ विभागात नोंद झालेल्या म्युकरमायकोसिसच्या ४९ रुग्णांमधून १३ रुग्णांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील ७७ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. १४ रुग्णांना ‘ईएनटी’ विभागात, ४ रुग्णांना नेत्ररोग विभागात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. २० रुग्णांवर औषधोपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांच्या जबड्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. लक्षणे दिसताच उपचार हेच या आजारातून बाहेर पडण्याचा यशस्वी मार्ग आहे.

- डॉ. अभय दातारकर, ‘ओरल अ‍ॅण्ड मॅक्सिलोफेशियल सर्जरी’ विभाग, शा.दंत रुग्णालय

- रोज एक-दोन शस्त्रक्रिया

शासकीय दंत रुग्णालयात येणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची नोंद करून त्यांना आजारानुसार ईएनटी, नेत्ररोग किंवा मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागाकडे पाठविले जाते. दंत रुग्णालयात मॅक्सिलोफेशियलच्या रोज एक ते दोन शस्त्रक्रिया होत आहेत.

-डॉ. मंगेश फडनाईक, अधिष्ठाता, शा.दंत रुग्णालय

Web Title: Patients with myocardial infarction are also recovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.