भर उन्हात लागते रुग्णांची रांग !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 07:44 PM2018-02-22T19:44:23+5:302018-02-22T19:51:30+5:30

३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत लागावे लागते. येथे बसायला खुर्च्या तर नाहीच डोक्यावर छप्परही नाही. यामुळे डोळ्याच्या रुग्णांना कडक उन्हात उभे राहावे लागण्याची वेळ येते. हे विचित्र चित्र आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे.

Patients queue in the sun! | भर उन्हात लागते रुग्णांची रांग !

भर उन्हात लागते रुग्णांची रांग !

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूर मेडिकलचा नेत्ररोग विभाग : नोंदणी कार्ड तयार करण्यासाठी एकच कर्मचारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कुणाला नीट दिसत नाही, कुणाला डोळ्यात जखम झालेली तर कोणी शस्त्रक्रिया केल्यानंतर पुढील उपचारासाठी आलेला, परंतु या सर्वांना एकाच दिव्यातून जावे लागते ते म्हणजे नोंदणी खिडकीतून. ३०० ते ४०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत लागावे लागते. येथे बसायला खुर्च्या तर नाहीच डोक्यावर छप्परही नाही. यामुळे डोळ्याच्या रुग्णांना कडक उन्हात उभे राहावे लागण्याची वेळ येते. हे विचित्र चित्र आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे.
मेडिकलच्या नेत्ररोग विभागात ‘लॅसिक लेझर’पासून ते ‘रेटिनोपॅथी’सारखे विभाग सुरू होऊन अद्ययावत यंत्रसामुग्री उपलब्ध झाली आहे. याचा फायदा रुग्णांना होत आहे. परिणामी, दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. पूर्वी या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) २०० वर रुग्णांची नोंद व्हायची. आता ती वाढून ३०० ते ४०० वर गेली आहे. पूर्वी नेत्र रुग्णांच्या नोंदणी कार्डाची सोय मेडिकलच्या मुख्य इमारतीत होती. परंतु नेत्ररोग विभागाची स्वतंत्र इमारत झाल्याने रुग्णांच्या सोयीसाठी त्याच इमारतीत नोंदणी खिडकी सुरू करण्यात आली. ‘हेल्थ इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम’(एचआयएमएस)अंतर्गत या खिडकीतून नोंदणी कार्ड दिले जाते. परंतु येथे ‘एचआयएमएस’चा एकच कर्मचारी असतो. या कर्मचाऱ्याला प्रत्येक रुग्णाचे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याची नोंद, वयोवृद्ध असेल तर आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्राची नोंद घ्यावी लागते, सोबतच शुल्कही घ्यावे लागते. परिणामी, एका रुग्णाला साधारण तीन ते चार मिनिटांचा वेळ लागतो. विशेष म्हणजे जुन्या, नव्या व महिलांसाठी एकच रांग लागते. यामुळे रांग लांबत जाऊन प्रवेशद्वाराच्या पलीकडे जाते. येथे रुग्णांच्या सोयीसाठी बसायला खुर्च्या नाहीत. नोंदणी खिडकीच्या समोर जे शेड टाकले आहे तेही तोकडे आहे. यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त रुग्णांना उन्हात उभे राहावे लागते. विशेष म्हणजे, अनेक रुग्णांसोबत नातेवाईक राहत नाही, काही रुग्ण वयोवृद्ध असतात, काहींना समोरचे अस्पष्ट दिसते, त्या स्थितीतही त्यांना ताटकळत तासन्तास रांगेत उभे राहावे लागते.

Web Title: Patients queue in the sun!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.