आरोग्याची काळजी घ्या! श्वसन विकरांच्या रुग्णांना सामान्यांच्या तुलनेत दुप्पट धोका
By सुमेध वाघमार | Published: November 3, 2023 05:35 PM2023-11-03T17:35:46+5:302023-11-03T17:36:28+5:30
ओझोनचा वाढलेला स्तर, फटाके, थंडीमुळे रुग्णसंख्येत वाढ
सुमेध वाघमारे
नागपूर : दिवाळी आणि थंडी हा दुहेरी आनंदाचा क्षण आहे. मात्र, वातावरणातील बदल, वाढणारी थंडी, येत्या काळात हवामान खात्याने पावसाळी वातावरणाचा दिलेला अंदाज व अशावेळी वाढणारे ओझोनचे प्रमाण, फटाके व अन्य वायु प्रदुषण अशा श्वसन रोगास कारणीभूत ‘ट्रिगर’मुळे ‘अस्थमा’, ‘सीओपीडी’ व अन्य फुफ्फुस विकारांच्या रुग्णांना दुप्पट धोका निर्माण झाला आहे. या दरम्यान योग्य काळजी घेतली नाही, तर दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात श्वसनविकारांच्या रुग्णांमध्ये वाढ होईल, अशी चिंता क्रिम्स हॉस्पिटलचे श्वसनरोगतज्ज्ञ डॉ. अशोक अरबट यांनी व्यक्त केले.
प्रदुषण हे बाहेरील प्रदुषण एवढ्यापुरते मर्यादीत राहत नाही तर, घराअंतर्गत प्रदुषण जे दिवाळीची स्वच्छता, रंगरंगोटी, अगरबत्ती व घरात जाळायचे फटाके यामुळेही होते; या बाबींकडेही लक्ष दिले पाहिजे. या प्रदुषणामुळे सर्दी-खोकला व दम्याचा त्रास असेल तर त्यात वाढ होते. जुनाट दमा व श्वसनविकार असलेल्यांनी या दुर्लक्षित प्रदुषणाची जाणीव ठेवून विशेष काळजी घेण्याचे आवाहनही डॉ. अरबट यांनी केले.
- प्रदूषण फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हानीकारक
वातावरणातील प्रदुषण हे सातत्याने वाढत आहे. कारखाणे व इंडस्ट्रीज, मोठ-मोठी बांधकामे यामुळे कणांचे प्रदुषण वाढत आहे. फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी हे हानीकारक आहे. दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाºया वायुप्रदुषणाचा त्रासही अनेकदा होऊ शकतो. दिवाळीच्या फटाक्यांमुळे त्वचेला आणि कानांना त्रास होतो. सोबतच घसा खवखवणे, डोळ्यात पाणी येणे कानात बधीरता येणे, अंगावर खाज येणे अशी लक्षणे देखील उद्भवू शकतात.
- गंभीर कोरोना होवून गेलेल्यांनी फटाक्यांच्या धूरापासून दूर रहा
फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरात सल्फरडाय ऑक्साईड, कार्बन मोनोआऑक्साईड, नायट्रस आऑक्साईड आणि अन्य विषारी वायू असतात. त्यामुळे सर्दी-खोकला, दमा, सीओपीडी, इंटरस्टेशियल लंग्स डिसिजची शक्यता वाढते. ज्यांना गंभीर स्वरुपातील कोविड होऊन गेलाय अशा रुग्णांनी या धुरापासून दूर रहावे. याशिवाय घराला रंग देताना त्यात वापरण्यात येणाºया द्रव्यामधून विशिष्ट प्रकारचा वायु निघतो. त्यामुळे देखील श्वसनाच्या समस्या उद्भवतात.
- डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास
पावसाळा संपून वातावरणात गारठा निर्माण झाला असला, तरी अधुन-मधून ढगाळ वातावरण राहते. त्यामुळे वातावरणात ओझोन वायुचा स्तर वाढतो. डोळ्यात जळजळ, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे दिसून येतात व पयार्याने त्याचे रुपांतर सर्दी-खोकला-ताप यामध्ये होते. सामान्यांसह श्वसनविकारांच्या रुग्णांना यामुळे त्रास होतो व विकार वाढतात. सोबतच वातावरणातील स्मॉग (प्रदुषणयुक्त धुके) हे देखील श्वसनविकारांसाठी कारणीभूत असल्याचा अभ्यास सांगतो.
- श्वसनासंबंधी आजार बळावतात
जेव्हा ऋतू बदलतो, तेव्हा आपल्या शरीराला त्या वातावरणाशी समरस होण्यास वेळ लागतो. त्या वेळेसही श्वसनाशी संबंधीत आजार बळावतात. दम्यासह व्हायरल फिवर, ताप, अंगदुखी, सर्दी यांचेही प्रमाण वाढते. लहान मुलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर त्याचा अधिक परिणाम पडतो. अशा वेळी प्रतिबंधात्मक उपाय करून विकार होऊ नये म्हणून काळजी घ्यावी
- डॉ. अशोक अरबट, ज्येष्ठ श्वसनरोगतज्ज्ञ