घराघरांत ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण; पावसाच्या उघडझापचा प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2022 08:23 PM2022-08-09T20:23:01+5:302022-08-09T20:23:51+5:30
Nagpur News आरोग्यासाठी अतिशय अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. मेडिकल, मेयोत दिवसाला २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे.
नागपूर : आरोग्यासाठी अतिशय अपायकारक असलेल्या सध्याच्या वातावरणामुळे ‘व्हायरल इन्फेक्शन’चे रुग्ण वाढले आहेत. मेडिकल, मेयोत दिवसाला २०० ते ३०० रुग्ण उपचारासाठी येत असल्याची माहिती आहे. खाजगी हॉस्पिटलमध्येसुद्धा रुग्णांची गर्दी वाढली आहे. व्हायरल इन्फेक्शनचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे.
पावसाळ्यामुळे वातावरणात झालेल्या बदलामुळे संसर्गजन्य आजार वाढले आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, दूषित पाण्याच्या पुरवठ्याने गॅस्ट्रो, डेंग्यूच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण, थंडी, पाऊस व मध्येच ऊन आणि दमट वातावरणामुळे जीवाणू व विषाणूंचे प्रमाण वाढले आहे. सध्याच्या वातावरणामुळे घराघरांत ‘व्हायरल’चे रुग्ण दिसून येत आहेत. यात लहान मुलांमध्ये १०१-१०३ अंशापर्यंत जाणारा ताप, सोबत अंगदुखी व ‘थ्रोट इन्फेक्शन’चे अधिक रुग्ण असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- एकाच घरात दोनपेक्षा जास्त रुग्ण
बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने ‘व्हायरल इन्फेक्शन’ पसरतो. यामुळे एकाच घरात दोनपेक्षा अधिक रुग्ण दिसून येत आहेत. तज्ज्ञांच्या मते, बाधित रुग्णांपासून अंतर ठेवल्यास, मास्कचा वापर केल्यास व वारंवार हात साबणाने स्वच्छ धुऊन घेतल्यास संसर्गाचा धोका कमी होतो.
- सर्दी-खोकल्यातही वाढ
सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले तरी याकडे दुर्लक्ष करणे अनेकवेळा घातक ठरू शकते. ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांचे म्हणणे आहे. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी नाकातून पाणी येणे, सर्दी होणे, नाक लाल होणे, खोकला येणे आदी प्रकारचे त्रास डोके वर काढतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा अधिक त्रास होतो.
- हे करा
शक्यतोवर पावसात ओले होऊ नका. बाहेरचे खाणे टाळा. उकळून थंड केलेलेच पाणी प्या. कुठलाही पदार्थ खाताना हात स्वच्छ धुवा. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवा. नियमित व्यायाम करा. जास्तीतजास्त पाणी प्या. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- ताप अंगावर काढू नका
ताप, सर्दी, पडसे अंगावर काढू नका. कोणत्याही आजारासाठी तात्पुरते उपचार करू नका. स्वत:हून औषधी घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला व औषधोपचार घ्या. मास्कचा वापर करा. गर्दीचे ठिकाण टाळा.
- डॉ. जय देशमुख, फिजिशियन
:: ‘इन्फेक्शन’ची लक्षणे
- सर्दी, खोकला
- डोके व संपूर्ण अंग दुखणे
- ताप येणे
- मळमळ होणे
- श्वास घ्यायला त्रास होणे
- औषध घेतल्यावरसुद्धा तीन दिवस ताप चढउतार होत राहणे