पटोले हे मुख्यमंत्री बनण्याच्या भूलथापा मारत आहेत
By कमलेश वानखेडे | Published: October 24, 2024 05:46 PM2024-10-24T17:46:20+5:302024-10-24T17:47:31+5:30
परिणय फुके यांची टीका : साकोलीत भाजप जिंकणार
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आपण मुख्यमंत्री बनणार असल्याचे सांगून भूलथापा मारत आहेत. त्यांना काँग्रेसने जागा वाटपाच्या प्रक्रियेबाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांचे तिकीट वाटपात योगदान नाही. मतदारसंघात भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावत आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळे विधान भवन बनवावे लागेल, अशी टीका भाजप नेते आ. डॉ. परिणय फुके यांनी केली.
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना फुके म्हणाले, नाना पटोले हे बेताल वक्तव्य करतात. त्यांच्यात अहंकार आला आहे. पक्षश्रेष्ठी नाराज असल्याने त्यांना आता साईडलाईन करण्यात आले आहे. साकोली मतदारसंघ भाजपकडे राहील अशी चर्चा आहे. पटोले यांना मतदारसंघात अडकवून ठेवण्यासाठी नाही तर पराभूत करण्याचा भाजपचा प्रयत्न असून यावेळी ते नक्कीच पराभूत होतील, असा दावाही फुके यांनी केला.
अनिल देशमुख यांच्या पुस्तकाबाबत विचारणा केली असता भ्रष्टाचारी लोकांच्या पुस्तकाला आपण भीक घालत नाही, अशी रोखठोक प्रतिक्रिया त्यांनी दिली. निवडणुकीच्या काळात काय विकास काम केले याचे पुस्तक छापायला पाहिजे होते. या पुस्तकातून ते काही साध्य करू शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.