नागपुरात हरलेले पटोले आता फडणवीसांविरोधात लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:07 AM2021-07-25T04:07:16+5:302021-07-25T04:07:16+5:30
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर ...
नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आता माजी मुख्यमंत्री व विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. शनिवारी महापालिका निवडणूक तयारीसाठी आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत पटोले यांनी तसे सूतोवाच केले. त्यामुळे पुढील निवडणुकीत फडणवीस विरुद्ध पटोले असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.
नागपूर महापालिकेत गेल्या १५ वर्षांपासून असलेली भाजपची सत्ता उलथून टाकण्यासाठी नाना पटोले यांनी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून पटोले यांनी शनिवारी तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वेगवेगळी बैठक घेऊन आढावा घेतला. विशेष म्हणजे या मोहिमेची सुरुवात त्यानी देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघापासून केली. या बैठकीत बोलताना पटोले यांनी पक्षाने आदेश दिल्यास नागपूर दक्षिण-पश्चिममधून निवडणूक लढेन, असे वक्तव्य केले.
विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभेची निवडणूक लढली होती. त्यावेळी गडकरी यांना लाखाच्या फरकाने पराभूत करू अन्यथा राजकारणातून निवृत्त होऊ, अशी घोषणा पटोले यांनी केली होती. परंतु, पटोले मोठ्या फरकाने पराभूत झाले व ते राजकारणातून निवृत्त होण्याऐवजी अधिक सक्रिय झाले. साकोलीतून विधानसभेची निवडणूक जिंकत विधानसभेचे अध्यक्ष झाले. पुढे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदही मिळाले. त्यामुळे पटोले यांनी दूरचा विचार करूनच फडणवीस यांच्या विरोधात लढण्याचे सूतोवाच केले असावे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.