देशभक्ती कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही - प्रणव मुखर्जी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:18 AM2018-06-08T06:18:33+5:302018-06-08T06:18:33+5:30
आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे.
नागपूर : आपला देश विविधतेने नटलेला असून, सहिष्णूतेतून आपल्याला सामर्थ्य मिळते. मात्र धर्म, प्रांत, द्वेष आणि असहिष्णुता यांतून राष्ट्रीय ओळख धुळीस मिळते. त्यामुळे भारतीयत्व हीच आपली ओळख जपली पाहिजे. देशाला कुठलाही भूगोल, भाषा आणि धर्म-पंथाची चौकट नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे देशभक्ती ही कुठल्याही धर्माची मक्तेदारी नाही, असे परखड मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त करीत रा. स्व. संघाला खडे बोल सुनावले. संघाच्या तृतीय वर्ष शिक्षा वर्गाच्या समारोपप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी गजेंद्रसिंह प्रामुख्याने उपस्थित होते. काँग्रेसच्या मुशीतून घडलेले प्रणव मुखर्जी या कार्यक्रमाला येणार असल्यामुळे देशात खळबळ उडाली होती.
हिंसाचाराविषयी नाराजी
मी येथे देश व देशभक्ती काय असते हे समजवायला आलो आहे, असे म्हणत प्रणव मुखर्जी यांनी भाषणाला सुरुवात केली. त्यांनी राष्ट्र, राष्ट्रभावना आणि देशभक्तीची संकल्पना मांडली. देशात सतत सुरू असलेल्या हिंसाचाराचा उल्लेख करीत त्यांनी नाव न घेता भाजपाचे कानही टोचले.
भारतीय राष्ट्रवाद ही वैश्विक भावना आहे. भारताचा राष्ट्रवाद हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्त्वावर आधारित असल्याने भारताचे दरवाजे सर्वांना खुले आहेत. राष्ट्रवाद विशिष्ट एका जात, धर्म, भाषा यांच्या अधीन नाही. देशासाठी समर्पण हीच खरी देशभक्ती आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
गांधी, नेहरूंचे विचार ऐकविले
या वेळी प्रणव मुखर्जी यांनी संघ स्वयंसेवकांना महात्मा गांधी व जवाहरलाल नेहरूयांच्या विचारांमधील राष्ट्रवाद समजावून सांगितला.
भारतीय राष्ट्रवाद हा विध्वंसक, आक्रमक नाही, असे महात्मा गांधी म्हणाले होते; तर पंडित नेहरू यांनी राष्ट्रवाद हा हिंदू, मुस्लीम, शीख व इतर धर्मांच्या विचारांच्या एकत्रीकरणातूनच येऊ शकतो, असे विचार मांडले होते.
काँग्रेसमध्ये संताप
नवी दिल्ली : प्रणव मुखर्जी रा. स्व. संघाच्या व्यासपीठावर गेल्याबद्दल काँग्रेसने स्पष्ट शब्दांत संताप व्यक्त केला आहे. महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा संघाशी संबंधित असताना आणि संघाचा इतिहास माहीत असताना मुखर्जी यांनी तिथे जायला नको होते, अशा आशयाचे ट्विट काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीत संघाचा सहभाग नव्हता आणि तिरंग्याबद्दलही संघाला आदर नाही. गांधीजींच्या हत्येनंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी मिठाईही वाटली होती, याचाही उल्लेख काँग्रेसने ट्विटमध्ये केला आहे.