नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2022 07:00 AM2022-03-22T07:00:00+5:302022-03-22T07:00:07+5:30

Nagpur News तीन वर्षांपासून रखडलेला मेडिकलमधील सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे दर महिन्याला तीन ते चार लाख विजेचे युनिट वाचणार असल्याने जवळपास ३३ लाखांच्या खर्चाची बचत होणार आहे.

Pave way for solar energy project in Nagpur Medical College and Hospital | नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग मोकळा

Next
ठळक मुद्देदर महिन्याला वाचणार ३३ लाख १६ लाख ३८ हजार युनिटचे दरवर्षी उत्पादन

सुमेध वाघमारे

नागपूर : तीन वर्षांपासून रखडलेला मेडिकलमधील सौरऊर्जा प्रकल्पाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या प्रकल्पामुळे दर महिन्याला तीन ते चार लाख विजेचे युनिट वाचणार असल्याने जवळपास ३३ लाखांच्या खर्चाची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, सौरउर्जेने सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलही उजळून निघणार आहे.

गरीब रुग्णांसाठी आशेचे किरण ठरलेल्या मेडिकललाही वीज बिलाचे चटके सहन करावे लागत आहे. दरमहा जवळपास ८० लाख रुपये विजेवर खर्च होत आहे. एकीकडे नवे बांधकाम, नवे यंत्र उपलब्ध होत असल्याने विजेची मागणी वाढतच चालली आहे. यावर मेडिकल प्रशासनाने सौरऊर्जेचा पर्याय निवडला. मात्र, निधीअभावी प्रकल्प रखडत चालला होता. अखेर पालकमंत्री नितीन राऊत यांनी यासाठी पुढाकार घेतला. यामुळे प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. मेडिकलच्या विविध इमारतीवर सौर पॅनल लागणार असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने छताचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करणे सुरू केले आहे.

-प्रकल्पावर ५ कोटी २८ लाखांचा खर्च

मेडिकलच्या सौरऊर्जेवर ५ कोटी २८ लाख ७५ हजार ५८७ रुपयांचा खर्च होणार आहे. ६४० किलो वॅटच दोन युनिट लागणार आहे. यातून दरवर्षी जवळपास १६ लाख ३८ हजार ४०० युनिटचे उत्पादन होणार आहे. दरमहा तीन ते चार लाख युनिट वाचणार आहे. सध्या मेडिकलला ११ रुपये दराने प्रति युनिट वीज मिळते. त्यानुसार जवळपास दर महिन्याला विजेवर होणाऱ्या खर्चातून ३३ लाखांची बचत होणार आहे. महाऊर्जा (मेढा) प्राधिकरणाकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे.

-‘सुपर’च्या इमारतीवरही लागणार सौर पॅनल

सौरऊर्जेचा हा प्रकल्प ८८ हजार ५९२ क्षेत्रफळात पसरलेला असणार आहे. यासाठी मेडिकलच्या संपूर्ण इमारतीच्या छतासोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा छताचाही उपयोग सौर पॅनलसाठी होणार आहे. पुढील चार महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

-विजेवर होणाऱ्या मोठ्या खर्चाची बचत होणार 

ऊर्जाबचत आणि विजेवर होणारा खर्च कमी करण्यासाठी सौरऊर्जा वरदान ठरत आहे. म्हणूनच सौरऊर्जा प्रकल्प लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामधून विजेवर होणाऱ्या मोठ्या खर्चाची बचत होणार आहे. लवकरात लवकर हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे.

-डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल

Web Title: Pave way for solar energy project in Nagpur Medical College and Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.