लोकमतचा प्रभाव : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आवारात रुग्णांसाठी टाकला मंडप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:14 PM2020-05-15T21:14:34+5:302020-05-15T21:20:22+5:30

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ आली होती. या वृत्ताला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी बाहेर मंडप टाकला.

Pavilion set up for patients in the premises of Super Specialty Hospital | लोकमतचा प्रभाव : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आवारात रुग्णांसाठी टाकला मंडप

लोकमतचा प्रभाव : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आवारात रुग्णांसाठी टाकला मंडप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची गर्दी होत असल्याने ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे कठीण जाते. परिणामी, रुग्णालय प्रशासनाने रुग्णांची रांग रुग्णालयाबाहेर लावण्याचे आदेश काढले. परंतु आवश्यक सोय न केल्याने रुग्णांना उन्हात तासन्तास उभे राहण्याची वेळ आली होती. या वृत्ताला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने रांगेत उभे राहणाऱ्यांसाठी बाहेर मंडप टाकला. विशेष म्हणजे, गर्दी विभागण्यासाठी न्युरो सर्जरी व न्युरोलॉजी विभागाच्या ‘ओपीडी’ दिवसातही बदल केला.
मध्य भारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिट हॉस्पिटल आहे. येथील बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. रुग्ण संख्येच्या तुलनेत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील बाह्यरुग्ण विभागाचा परिसर कमी पडतो. विशेषत: सोमवार ते गुरुवारी रुग्णांना दाटीवाटीने उभे रहावे लागते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांची गर्दी कमी करण्यासाठी व फिजिकल डिस्टन्सिंग होत नसल्याने नाईलाजाने रुग्णालय प्रशासनाला रुग्णालयाबाहेर रुग्णांची रांग लावण्याची वेळ आली. परंतु ९ नंतर वाढणारे उन्ह, त्यात आजाराचे दुखणे सहन करीत रुग्णांना उन्हात रांगेत उभे राहावे लागत होते. ‘लोकमत’ने या संदर्भात वृत्त प्रकाशित केले. याची दखल नगरसेवक विजयकुमार चुटेले व प्रभाग १८ चे भाजपा युवामोर्चाचे उपाध्यक्ष गुड्ड भैसवरे यांनी घेतली. त्यांनी मंडपाची नि:शुल्क सोय उपलब्ध करून दिली.

‘न्युरो’चे दिवस आता बुधवार व शनिवार
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी व गुरुवारी रुग्णालयात प्रचंड गर्दी होत असल्याने या दिवशी ‘ओपीडी’ असलेले न्युरोसर्जरी व न्युरोलॉजी विभागाचे दिवस बदलविण्यात आले. आता बुधवार व शनिवार या दिवशी दोन्ही विभागांचे रुग्ण तपासले जाणार आहेत, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. मिलिंद फुलपाटील यांनी दिली.

रुग्णालयाच्या पश्चिमेकडे ओपीडी
बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) गर्दी कमी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. रुग्णालयाच्या पश्चिमेकडे म्हणजे नुकतेच स्थापन झालेल्या ‘बी विंग’ व ‘ए विंग’मधील मोकळ्या जागेवर ‘ओपीडी’चा विस्तार केला जाणार आहे. या संदर्भात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत.
डॉ. मिलिंद फुलपाटील
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

असे आहेत ‘ओपीडी’चे दिवस

वार आणि विभाग
सोमवार, गुरुवार कार्डिओलॉजी, सीव्हीटीएस
मंगळवार, शुक्रवार गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, नेफ्रोलॉजी, युरोलॉजी
बुधवार, शनिवार न्युरोसर्जरी, न्युरोलॉजी, एन्डोक्रायनोलॉजी

Web Title: Pavilion set up for patients in the premises of Super Specialty Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.