‘पवार’बाह्य मुख्यमंत्री शिक्षक संघटनांना खुपतात - विनोद तावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:43 PM2017-12-12T23:43:49+5:302017-12-12T23:44:09+5:30
शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही.
- योगेश पांडे
नागपूर : शिक्षकांना शिकविण्याव्यतिरिक्त इतर शाळाबाह्य काम देणे अयोग्य आहे. जिल्हा परिषद, मनपाच्या शाळांमधील शिक्षकांना देण्यात येणा-या शाळाबाह्य कामाला आमचा विरोधच आहे. मात्र हा प्रकार आमच्या कार्यकाळातच सुरू झाला आहे असे नाही. परंतु ‘पवार’बाह्य मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री झाल्यामुळे शिक्षक संघटनांना शाळाबाह्य कामांच्या मुद्याची आठवण आली आहे, या शब्दांत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षक संघटनांवर टीकास्त्र सोडले.
शालेय तसेच उच्च शिक्षणासंदर्भातील विविध मुद्यांवर तावडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. खासगी अनुदानित शाळेतील शिक्षक भरतीतील गैरव्यवहार टाळण्यासाठी व गुणवत्तेवर आधारित निवड होऊन निवड प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. यानुसार राज्यातील शाळांमध्ये शिक्षक पदांची भरती ‘पवित्र’ या केंद्रीय परीक्षा पध्दतीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याविरोधात काही शिक्षक संघटना न्यायालयात गेल्या. मात्र न्यायालयाने शासनाची भूमिका उचलून धरली.
मुळात पैसे देऊन नोकरी मिळविल्यानंतर हेच शिक्षक आंदोलने करतात व प्रशासन-मंत्र्यांना शिव्यांची लाखोळी वाहतात. या ‘पवित्र’मुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण येणार असल्याचा त्यांनी दावा केला.
शिक्षक आमदारांचे गणित कच्चे
पटसंख्या कमी असणा-या आणि शैक्षणिक गुणवत्ता ढासळलेल्या जिल्हा परिषदेच्या राज्यातील १ हजार ३१७ प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार आहेत. यामुळे जास्तीत जास्त १३ हजार विद्यार्थ्यांना दुसºया शाळेत समायोजित करावे लागेल. मात्र काही शिक्षक आमदार याला राजकीय स्वरूप देत असून यामुळे दोन लाख विद्यार्थ्यांना शाळेपासून वंचित रहावे लागेल, असा प्रचार करीत आहेत. शिक्षक आमदारांचे गणित बहुधा कच्चे असावे, असा चिमटा तावडे यांनी यावेळी काढला. काही शिक्षक आमदार दिशाभूल करीत असून मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यापेक्षा त्यांना शिक्षक बदलीचा प्रश्न जास्त सतावतो आहे, असेदेखील तावडेंनी प्रतिपादन केले.
विद्यार्थी निवडणुका पुढील वर्षीपासून
नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी संघाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने होतील, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र निवडणुका घेण्यासाठी नियम व परिनियम तयार होणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. मात्र आता अर्धे सत्र निघून गेले आहे. आता निवडणुका घेणे योग्य होणार नाही.
त्यामुळे जून २०१८ मध्ये यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात येईल व पुढील शैक्षणिक सत्रापासून निवडणूका होतील, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.