पवारांची नवी खेळी, अध्यक्षपदी माजी मंत्र्यांची जोडी
By admin | Published: September 12, 2015 02:52 AM2015-09-12T02:52:41+5:302015-09-12T02:52:41+5:30
आपल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मिळावे, यासाठी मुंबईत जोरात लॉबिंग करणाऱ्या माजी मंत्र्यांच्याच गळ्यात पक्षनेतृत्वाने अध्यक्षपदाची घंटा बांधली आहे.
गटबाजी करणाऱ्यांकडेच धुरा : देशमुख व बंग यांच्यासमोर पक्षवाढीचे आव्हान
आपल्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादीचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षपद मिळावे, यासाठी मुंबईत जोरात लॉबिंग करणाऱ्या माजी मंत्र्यांच्याच गळ्यात पक्षनेतृत्वाने अध्यक्षपदाची घंटा बांधली आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडे शहर अध्यक्षपद तर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपद रमेश बंग यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. कार्यकर्त्यांच्या हक्काचे कारण समोर करीत पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालणाऱ्या या नेत्यांवरच आता पक्ष सावरण्याची, वाढविण्याची व ‘रिझल्ट’ देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी विचारपूर्वक घेतलेल्या या निर्णयामुळे कार्यकर्त्यांसाठी उठाठेवी करणाऱ्या या नेत्यांना आता स्वत:चे नेतृत्व सिद्ध करण्यासाठी धडपड करावी लागणार आहे.
देशमुख व बंग हे दोन्ही माजी मंत्री राष्ट्रवादीचे विदर्भातील नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, आता त्यांच्याकडे शहर व जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवून पक्षाने एकप्रकारे त्यांचे ‘डिमोशन’ केले, अशी पक्षात चर्चा आहे. मात्र, दोन जबाबदार व दिग्गज नेत्यांच्या हाती शहर व जिल्ह्याची धुरा सोपविल्यामुळे पक्ष संघटना बळकट होईल, पक्षाची ताकद वाढेल व आगामी निवडणुकांमध्ये याचा फायदा होईल, असा दावाही समर्थक करीत आहेत. मात्र, त्यासाठी आता या दोन्ही नेत्यांना आपसातील मतभेद बाजूला सारून हातात हात घालून काम करावे लागणार आहे. नाहीतर ‘घडाळ्याची’ उरलीसुरली टीकटीकही बंद झाल्याशिवाय राहणार नाही.
देशमुख व बंग हे दोन्ही नेते तसे नागपूर ग्रामीणचे नेतृत्त्व करणारे. देशमुख यांनी वजन वापरून आपले विश्वासू बंडू उमरकर यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष केले होते तर बंग यांनी छुपे पाठबळ देत अजय पाटील यांना शहर अध्यक्ष बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, देशमुख यांचे समर्थक सातत्याने शहरात अजय पाटील यांच्या विरोधात मोर्चेबांधणी करायचे तर बंग समर्थक ग्रामीणमध्ये उमरकर यांच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे. त्यामुळे पक्षातील गटबाजीचा गुंता आणखी वाढतच गेला. नव्याने शहर व जिल्हाध्यक्ष निवडण्याची वेळ आली तेव्हा निरीक्षकांसमोरही गटबाजी उफाळून आल्याचे पहायला मिळाले. अनिल देशमुख यांच्या गटाकडून अनिल अहीरकर यांचे नाव समोर करण्यात आले होते तर रमेश बंग व अजय पाटील यांच्याकडून रमण ठवकर यांचे नाव देण्यात आले होते.
त्यावेळी प्रदेश पदाधिकारी मुंबईहून अध्यक्षांची घोषणा करतील, असे निरीक्षकांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरही पाटील समर्थकांनी समानांतर निवडणूक घेत ठवकर यांची निवड झाल्याचे जाहीर केले होते. ग्रामीणमध्ये अनिल देशमुख पुन्हा एकदा बंडू उमरकर यांच्यासाठी इच्छुक होते. तर बंग यांच्या मनात दुसरेच नाव होते. दोन्ही नेत्यांनी आपल्या समर्थकाची अध्यक्षपदी वर्णी लावण्यासाठी मुंबईत वजन खर्ची घातले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते नागपुरातील गटबाजीमुळे त्रस्त झाले होते. देशमुखांची बाजू घ्यावी की बंग यांची असा प्रश्न नेत्यांचा नेहमीच सतावत होता. दोन्ही नेते पक्षासाठी महत्त्वाचे असल्यामुळे कुणा एकाची बाजू घेणे पक्षहिताचे नव्हते. मात्र, जसे वर्गात गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यालाच कॅप्टन करून वर्ग शांत ठेवण्याची शक्कल गुरुजी लढविताना दिसतात तोच फॉर्म्युला शरद पवार यांनी वापरून या दोन्ही नेत्यांच्या हातीच पक्षाची सूूत्रे सोपविली आहेत.
आजवर शहर व जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या आंदोलनात नेते म्हणून सहभागी होणाऱ्या या दोन्ही नेत्यांना आता स्वत: हाती पक्षाचा झेंडा घेऊन ऊन-पावसात रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. आपला व परका हा भेदाभेद सोडून जो राष्ट्रवादीचा तो आपला, अशी मोठ्या मनाची भूमिका स्वीकारावी लागेल. पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या दुसऱ्या फळीतील नेत्यांची घरवापसी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रसंगी नमते घ्यावे लागेल तरच पक्ष वाढीस लागेल.
सर्व काही नेत्यांनाच का ?
नेत्यांना अध्यक्षपद सोपवून जबाबदारी टाकली हे चांगलेच झाले, पण सर्वकाही नेत्यांनाच का ? कार्यकर्त्यांच्या हक्काची पदेही नेत्यांनाच दिली गेली तर कार्यकर्त्यांनी काय करायचे, फक्त कार्यक्रमांना गर्दी करायची व हात उंचावून आगे बढोचे नारेच द्यायचे का, अशा शब्दात काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या दोन्ही नेत्यांना नागपूर शहर व ग्रामीणचे ‘पालक’ करून कार्यशील कार्यकर्त्यांना अध्यक्ष व कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यायला हवी होती, असा विचारही पक्षात मांडला जात आहे.
मनपा व जि.प. निवडणुकीची परीक्षा
अध्यक्षपदी निवड झालेले देशमुख व बंग या दोन्ही नेत्यांपुढे दीड वर्षांनी होऊ घातलेल्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान आहे. शहरात पक्षसंघटना जेमतेम आहे. ग्रामीणमध्येही फारसा जोर नाही. त्यात दुय्यम फळीतील नेत्यांनी भाजपशी घरोबा केल्यामुळे ताकद कमी झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका या दोन्ही नेत्यांसाठी एकप्रकारे परीक्षाच असणार आहे. देशमुखांसाठी शहर तसे नवीन आहे. त्यामुळे ज्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर त्यांनी शहरात एन्ट्री मारली त्यांनाच आता रिचार्ज करावे लागेल. बंग यांनाही ग्रामीणमध्ये देशमुख समर्थकांना जवळ करून मत जोडावी लागतील. शेवटी हिशेब पक्षाला द्यायचा आहे.