विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2019 10:25 PM2019-10-28T22:25:26+5:302019-10-28T22:26:19+5:30
तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.
लक्ष्मी मानवटकर असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या केराडी, ता. पारशिवानी येथील रहिवासी आहेत. मंचच्या ग्राहक विधी सेवा निधीमध्ये ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार रुपये तक्रारकर्तीला द्यायचे आहेत. तसेच, तक्रारकर्तीला तक्रार खर्चाकरिता ५ हजार व शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार रुपये ओरिएन्टल इन्शुरन्सने तर, १० हजार रुपये जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीने द्यायचे आहेत. या निर्णयाचे पालन करण्यासाठी या कंपन्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर देय रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, लक्ष्मी मानवटकर यांचे पती अशोक शेतकरी होते. शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. अशोक यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत दोन लाख रुपयाचा विमा काढण्यात आला होता. २७ एप्रिल २०१७ रोजी अशोक यांचा अपघातात झाला. त्यामुळे त्यांचा १८ जून रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मी यांनी विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांचा दावा नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर प्रतिवादी कंपन्यांनी लेखी उत्तर दाखल करून आपापली बाजू मांडली. तसेच, तक्रार खारीज करण्याची विनंती केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ओरिएन्टल इन्शुरन्सने ही तक्रार प्रलंबित असतानाच तक्रारकर्तीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले होते. त्यामुळे त्या रकमेवर केवळ व्याज देण्याचा आदेश देण्यात आला.
यंत्रणा अकार्यक्षम
या प्रकरणात मागणी केलेली सर्व कागदपत्रे तक्रारकर्तीने सादर करूनही विमा दावा अयोग्यपणे फेटाळल्याचे दिसते. ही राज्य सरकारची अतिशय चांगली विमा योजना आहे. परंतु, अकार्यक्षम यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ पीडितांपर्यंत योग्यप्रकारे पोहचत नाही. या प्रकरणात यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केला असता तर, तक्रारकर्तीला मंचमध्ये तक्रार दाखल करण्याची गरज पडली नसती असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.