‘पे अॅण्ड पार्क’ नि:शुल्क तरीही वसुली जोरात
By Admin | Published: July 7, 2016 02:51 AM2016-07-07T02:51:25+5:302016-07-07T02:51:25+5:30
महापालिकेचे वाहतूक अभियंता यांनी मंगळवारपासून पंचशील चौक ते लोकमत चौक दरम्यान पार्किंग नि:शुल्क केल्याचे जाहीर केले.
पंचशील ते लोकमत चौक दरम्यानचा प्रकार : मनपाच्या नावाने पावतीही देतात
मंगेश व्यवहारे नागपूर
महापालिकेचे वाहतूक अभियंता यांनी मंगळवारपासून पंचशील चौक ते लोकमत चौक दरम्यान पार्किंग नि:शुल्क केल्याचे जाहीर केले. असे असतानाही बुधवारी ‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट दिलेल्या एजन्सीचे कर्मचारी धडाक्याने वसुली करीत होते. पार्किंग केलेल्या दुचाकी वाहनचालकाला महापालिकेची पे अॅण्ड पार्कची १० रुपयांची पावतीही देण्यात येत होती. लोकमतने प्रत्यक्ष केलेल्या पाहणीत हे वास्तव समोर आले आहे.
महापालिकेने नागरिकांना पार्किंगचे पैसे देऊ नका असे आवाहन केले, परंतु अवैध वसुली करणाऱ्या एजन्सीला बरखास्त केले नाही. त्यामुळे एजन्सीचा अवैध वसुलीचा धंदा बुधवारी जोरात सुरू होता. या फसवेगिरीच्या विरोधात आता महापालिका काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. पंचशील चौक ते लोकमत चौकादरम्यान महापालिकेने पे अॅण्ड पार्क योजना सुरू केली होती. ‘पे अॅण्ड पार्क’साठी उड्डाण पुलाखालच्या जागेवर वाहने पार्क करण्यासाठी महापालिकेने नेमलेल्या एजन्सी कडून पार्किंग शुल्क वसूल केले जात होते. दुचाकी वाहनाच्या पार्किंगसाठी एजन्सीचे कर्मचारी १० रुपये शुल्क वसूल करीत होते. परंतु पे अॅण्ड पार्कच्या बाबातीत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. दोन मिनिटांच्या कामासाठी १० रुपये देणे नागरिकांना परवडणारे नव्हते. बरेचदा एजन्सीचे कर्मचारी व नागरिकांमध्ये वादावादीही व्हायची. महापालिकेकडे पे अॅण्ड पार्क संदर्भात तक्रारी वाढत असल्याने वाहतूक अभियंत्यांनी पंचशील चौक ते लोकमत चौकादरम्यान उड्डाणपुलाखाली पार्किंग नि:शुल्क केले. महापालिकेने घेतलेला निर्णय मंगळवारी जाहीर करण्यात आला. त्याचबरोबर पार्किंगचे पैसे देऊ नका असे आवाहनही नागरिकांना केले. परंतु बुधवारी सकाळपासून एजन्सीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आपले दुकान लावून पुलाखाली बसले. पंचशील ते लोकमत चौकादरम्यान पार्क झालेल्या दुचाकी वाहनांकडून शुल्क आकारू लागले. दुपारी १ पर्यंत बऱ्याच वाहनांनी येथे पार्किंग केले होते. प्रति वाहन १० रुपये या हिशेबाने हे कर्मचारी वसूल करीत होते. पार्किंगची रितसर पावतीही देत होते. (प्रतिनिधी)
तुम्हाला पैसे द्यावेच लागेल
लोकमत प्रतिनिधींनी सुद्धा आपले वाहन ‘पे अॅण्ड पार्क’ मध्ये पार्क केले. तेथे असलेला एजन्सीचा कर्मचारी पावती घेऊन आला. त्याने गाडीचा नंबर लिहून रीतसर महापालिकेची पावतीही दिली. परंतु सदर प्रतिनिधीने पैसे देण्यास नकार दिल्यावर त्यांनी गाडी काढण्यास सांगितले. प्रतिनिधीने त्यांना महापालिकेने पार्किंग नि:शुल्क केले असल्याचे सांगितले. वृत्तपत्रात तशा बातम्याही प्रकाशित झाल्याचे सांगितले. परंतु त्या कर्मचाऱ्याने आम्हाला याबाबत काही माहीत नाही, असी भूमिका घेत तुम्हाला पार्किंगचे पैसे द्यावेच लागेल असे बजावले.
नागरिकांनाही माहिती नाही
लोकमत प्रतिनिधीने वाहने पार्क करणाऱ्या काही नागरिकांशी संवाद साधला. आजपासून येथील पार्किंग नि:शुल्क झाले असल्याची माहिती आहे का, अशी विचारणा केली असता अनेकांनी नकार दिला.
मनपाकडून जनजागृतीच नाही
महापालिकेने पार्किंग नि:शुल्क करण्यापूर्वी या परिसरात जाहीर नोटीस लावणे गरजेचे होते. दुकान लावून बसलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांना तेथून हाकलणे गरजेचे होते. नागरिकांची लूट होऊ नये म्हणून परिसरात विभागाचे कर्मचारी तैनात करणे गरजेचे होते. परंतु अशी कुठलीही जनजागृती महापालिकेकडून करण्यात आली नाही. त्यामुळे एजन्सीच्या कर्मचाऱ्यांची पार्किंगच्या नावावर अवैध वसुली सुरू आहे.