शाश्वत वीज निर्मितीकडे लक्ष द्या!
By Admin | Published: May 7, 2016 02:59 AM2016-05-07T02:59:25+5:302016-05-07T02:59:25+5:30
वीज निर्मिती क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमी खर्चात शाश्वत विजेच्या उत्पादनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
ऊर्जामंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना : खापरखेडा वीज प्रकल्पाची पाहणी
खापरखेडा : वीज निर्मिती क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी महानिर्मितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कमी खर्चात शाश्वत विजेच्या उत्पादनाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. यासाठी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करून ‘एमओडी मेन्टेन’ करावा, अशा सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्या. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी गुरुवारी महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज केंद्राला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत काही महत्त्वाच्या सूचना केल्या. ते म्हणाले, स्पर्धेच्या युगात कमी दराची वीज कुणीही विकत घेईल. खापरखेडा केंद्रातील वीज ‘एमओडी’च्या नियमानुसार एका पैशाने अधिक आहे. ही वीज यापेक्षा महागली तर त्याचा वीज केंद्रावर परिणाम होईल. यासाठी प्रशासकीय, तेल व अन्य खर्चाात कपात करावी लागेल. कमी खर्चात वीज निर्मिती झाल्यास कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्याची घोषणाही त्यांनी केली.
महानिर्मितीचे कोणतेही वीज केंद्र बंद पडणार नाही, यासाठी योग्य नियोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत वेकोलिच्या कोळशाचा अधिकाधिक वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘पीएलएफ’ वाढविण्यासाठी चांगल्या प्रतिच्या कोळशाची गरज आहे. चांगल्या प्रतिच्या कोळशाचा खापरखेडा वीज केंद्राला पुरवठा केला जात आहे. येथील वीज निर्मिती संच जुने असले तरी ते ९० टक्के क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
या केंद्रातील संच बंद ठेवण्याचे प्रमाणा २०१५-१६ मध्ये ४.२२ टक्के होते. ते प्रमाण यावर्षी ३.५० टक्क्यांवर आले आहे. तेल वापरण्याचे प्रमाण ०.३३ टक्क्यांवरून ०.३३० टक्क्यांवर आले आहे. केवळ ‘बॉयलर टर्बाईन लिकेज’मुळे संच बंद ठेवावे लागतात, अशी माहिती मुख्य अभियंता सीताराम जाधव यांनी दिली. यावर बावनकुळे यांनी सुरक्षेचे नियम पाळण्याची व अपघात टाळण्याची सूचना केली. रेल्वे वॅगनमधील कोळशााचे वजन करा, कोळशाचे व्यवहार व देखभाल आॅनलाईन पद्धतीने करा, पाण्याचा अपव्यय टाळा, पाणी साठविण्याची व्यवस्था करा, पावसाचे पाणी साठवून ठेवा, वीज केंद्राच्या आवारात गस्त सुरू करा, कोळसा भुकटी व राखेचा वापर रस्ते तयार करण्यासाठी करा, वृक्षारोपण करा, कर्मचारी वसाहतीतील समस्या सोडवा या सूचनांसह वीज नियामक आयोगाच्या निकषांची त्यांनी माहिती दिली. यावेळी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, प्रकल्प संचालक चंद्रकांत थोटवे, विजय सिंह, कार्यकारी संचालक मनोज रानडे, अनिल मुसळे, मुख्य महाव्यवस्थापक रानडे, मुख्य अभियंता सीताराम जाधव, ए. जी. देवतारे, अरुण सोनकुसरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कोळसा भुकटीच्या चौकशीचे निर्देश
वीज केंद्रातील कोळशाच्या भुकटीच्या नावाखाली चांगल्या प्रतिच्या कोळशाची विक्री केली जात असल्याची तक्रार ऊर्जामंत्र्यांकडे करण्यात आली. याची योग्य दखल घेत बावनकुळे शंनी कोळसा व भुकटीचे नमुने लगेच मागविले. पोलिसांना बोलावून या कोळशाची तपासणी करण्याचे तसेच प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. निविदांच्या अटीमध्ये वारंवार बदल केला जात असल्याने त्यांना नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्य कार्यालयाने घालून दिलेल्या नियमानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली. या अटींसाठी एक समिती तयार करण्याची तसेच निविदा मुदत ४५ दिवस ठेवण्याची सूचना त्यांनी केली.
‘त्यांना’ काळ्या यादीत टाका
कंत्राटी कामगारांनी तीन ते चार महिन्यांपासून पगार देण्यात आले नाही, अशा तक्रारी करण्यात आल्या. या कर्मचाऱ्यांचे पगार नियमित करण्याची जबाबदारी मुख्य अभियंत्याची असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. काही कंत्राटदार अधिकाऱ्यांना धमकी देत असल्याचा तसेच एकाच कंत्राटदाराला सर्वाधिक कामे दिल्याचा मुद्दाही पुढे आला. याची दखल घेत जैन यांना कोराडीत काळ्या यादीत टाकण्यात आले असून, खापरखेड्यातही काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश बिपीन श्रीमाळी यांनी दिले. महानिर्मितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ५० एकरात सुसज्ज वसाहती तसेच कोराडीत हॉस्पिटल तयार करण्याची माहिती यावेळी देण्यात आली.