निकालाची चिंता न करता पाणी टंचाईकडे लक्ष द्या
By कमलेश वानखेडे | Published: May 24, 2024 07:09 PM2024-05-24T19:09:18+5:302024-05-24T19:09:45+5:30
Nagpur : अनिल देशमुख यांची टीका
नागपूर : राज्यात मोठया प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व चारा टंचाई निर्माण झाली आहे. परंतु लोकसभेची आचारसंहीता असल्याने प्रशासनाला काम करता येत नाही. यामुळे राज्य सरकारने आचारसंहीता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाची चिंता न करता राज्यातील पाणी टंचाईसह इतर महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
राज्यात मोठया प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. राज्यातील तलावामध्ये सध्याच्या परिस्थीतीमध्ये केवळ ८ ते १५ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. अनेक तलावाने तळ गाठला असुन केवळ मृतसाठा हा शिल्लक राहला आहे. पिण्याच्या पाणीच नाही तर फळबागांना सुध्दा टँकरने पाणी देण्यात येत आहे. राज्यात जेव्हा आमचे सरकार होते त्यावेळी फळबागांसाठी जर टँकरने पाणी देण्याची वेळ आली तर त्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातुन अनुदान देण्यात येत होते. तसेच अनुदान आता सुध्दा देण्यात यावे, अशी मागणी देशमुख यांनी केली आहे.
राज्यात पाणी टंचाईसोबतच चारा टंचाईचा प्रश्न सुध्दा निर्माण झाला आहे. यामुळे गोपालक सुध्दा अडचणीत सापडले आहे. अश्या परिस्थीतीमध्ये चारा छावण्या सुरु करण्याची सुध्दा मागणी मोठया प्रमाणात होत आहे. पाणी व चारा टंचाई निर्माण झाली असली तरी लोकसभेची आचारसंहीता सुरु असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेची निवडणुक प्रक्रिया ही पुर्ण झाली आहे. यामुळे राज्य सरकारने आचारसंहीता शिथिल करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे.
पालकमंत्री गंभीर नाहीत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी नगर येथे मराठवाडाच्या पाणी टंचाईची आढावा बैठक ठेवली होती. यात पाच पालकमंत्री हे गैरहजर होते. यावरुन हे सरकार सामान्य नागरीकांच्या प्रश्नावर गंभीर नाही हे दिसुन येते, अशी टीकाही देशमुख यांनी केली.