थकीत कर भरा अन्यथा जेलमध्ये जाल : मनपा आयुक्तांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 09:10 PM2020-02-04T21:10:31+5:302020-02-04T21:11:30+5:30
मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :नागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील. ४ लाख ४३ हजार १४६ मालमत्ताधारकांकडे ५१४ कोटींची थकबाकी होती. यातील १ लाख १० हजार मालमत्ताधारकांनी ६० कोटींची थकबाकी भरली आहे. ३ लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्त्रोत असल्याने महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल असा इशारा त्यांनी दिला आहे. याबाबत कार्यवाहीचे आदेश आयुक्तांनी मालमत्ता विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
थकबाकीदारांना वारंवार अल्टीमेटम देउनही थकीत संपत्ती कर न भरणाºयांना मुंढे यांनी हा इशारा दिला आहे. थकीत संपत्ती कर वसुलीच्या या कठोर कारवाईमधून कोणतीही व्यक्ती सुटू शकणार नाही. कारवाई टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वेळोवेळी संपत्ती कर भरणा करावा, असे आवाहनही मुंढे यांनी केले आहे.
५ लाखांहून अधिक मालमत्ताकराची थकबाकी असलेल्यांची संख्या १७२ आहे. त्यांच्याकडे १७६ कोटींची थकबाकी आहे. चार मोठ्या थकबाकीदारांकडे तब्बल ८६ कोटींची थकबाकी आहे. यात कंटेनर डेपोकडे २८ कोटी, आयनॉक्स १८ कोटी, व्हीआरसीई २० कोटी तर मिहानकडे २० कोटींची थकबाकी आहे. तसेच यात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. परंतु यातील अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याने मागील काही वर्षांपासून थकबाकी वसूल करता आलेली नाही. अशी प्रकरणे निकाली काढण्याचा प्रयत्न आहे.
थकीत संपत्ती कर वसुली संदर्भात आतापर्यंत झालेली कारवाई
काढण्यात आलेले वारंट-९७४५
जप्ती व अटकावणी केलेल्या स्थावर मालमत्ता-२५९५
जाहीर लिलावाद्वारे विक्रीस काढलेल्या मालमत्ता-४९५
विक्री प्रमाणपत्र नोंदणीकृत करून हस्तांतरीत मालमत्ता- १२
मनपाच्या नावे करण्याच्या कार्यवाहीतील मालमत्ता-१३८