दंड भरू पण बाहेर फिरू; विनाकारण फिरणारे ४५० पॉझिटिव्ह !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:07 AM2021-05-21T04:07:59+5:302021-05-21T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांनाही निर्बंध आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांनाही निर्बंध आहेत. असे असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. याला आळा बसावा यासाठी विनाकारण फिरणाऱ्यांची विचारपूस करून महापालिका व पोलीस प्रशासनातर्फे कोरोना चाचणी केली जात आहे. मागील काही दिवसात शहरात १० हजारांहून अधिक लोकांची ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली. यात तब्बल ४५० पॉझिटिव्ह आढळून आले. या सर्वांची १४ दिवसांसाठी क्वारंटाइन सेंटरला रवानगी करण्यात आली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो लोकांना आपले जीव गमवावे लागल्यानंतरही विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. कोरोना साखळी खंडित करण्यासाठी राज्य शासनाने ३१मेपर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. गरज नसेल तर घराबाहेर पडूच नये, असे वारंवार सांगितले जात आहे. पॉझिटिव्ह असतानाही रस्त्यावर फिरणाऱ्या ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोना संक्रमण वाढत आहे. मात्र तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने प्रशासनाला कारवाई करावी लागत आहे.
...
शहरात ठिकठिकाणी तपासणी
विनाकारण फिरण्यालाही निर्बंध आहेत. असे असूनही अनेक जण कामाशिवाय घराबाहेर पडतात. अशा लोकांना आळा बसावा, यासाठी शहराच्या विविध भागात पोलीस विभागातर्फे नाकाबंदी करून ऑन दी स्पॉट अँटिजन चाचणी केली जात आहे.
....
फिरणाऱ्यांची कारणे सारखीच
विनाकारण फिरणाऱ्यांची कारणे ठरलेली आहेत. बाजारात भाजी खरेदीसाठी जात आहेत. किराणा आणण्यासाठी जातोय, दवाखान्यात काम आहे. अशा स्वरूपाची कारणे सांगितली जातात. सर्वांची कारणे जवळपास सारखीच असतात.
....
विनामास्क फिरणाऱ्या ३८०५४ लोकांना दंड
कोरोना संक्रमणाला आळा बसावा यासाठी विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड आकारला जात आहे. अशा लोकांवर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकामार्फत कारवाई केली जात आहे. आतापर्यंत ३८०५४ लोकांवर कारवाई करून १ कोटी ७३ लाख ८६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
...
बाजार व गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचणी
शहरातील बाजारपेठ असलेल्या इतवारी, कॉटन मार्केट, कळमना मार्केट यासाठी वर्दळीच्या भागात मनपाच्या फिरत्या टेस्टिंग सेंटरमार्फत कोरोना चाचणी केली जात आहे. यामुळे संक्रमणाला आळा बसण्याला मदत होत आहे.
....