किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 11:46 PM2019-06-17T23:46:37+5:302019-06-17T23:47:55+5:30
आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलनाबद्दल संस्थेचे नागपूर जिल्हा कमेटी अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले की, आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये मानधन व गटप्रवर्तकांना किमान १५ हजार मानधन देण्यात यायला हवे तसेच कर्मचाऱ्यांना शासनाने मानधन तत्त्वावर न ठेवता वेतन तत्त्वावर कामात सामावून घ्यायला हवे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारचे आंदोलन संपूर्ण राज्यात होत असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. मध्यंतरी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,अद्यापही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने निर्णय ताबडतोब घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी संघटनेच्या महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, मंदा गंधारे, रूपलता कांबळे, पौर्णिमा पाटील, लक्ष्मी कोटेजवार, वंदना बहादुरे, कल्पना हटवार, मीता भांडारकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.