ग्रामरोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 12:24 AM2019-12-21T00:24:22+5:302019-12-21T00:26:24+5:30
ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ग्राम रोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन देण्यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेच्यावतीने विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी ग्रामरोजगारांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक संघटनेने ग्रामरोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढला. पोलिसांनी टेकडी मार्गावर हा मोर्चा अडवून धरला. मोर्चात सहभागी ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार नारेबाजी करून शासन दरबारी मागण्या रेटून धरल्या. संघटनेचे राज्य अध्यक्ष महेंद्र मेश्राम, उपाध्यक्ष व्यंकट बिरादार, राज्य सचिव देवदत्त साळवे, कार्याध्यक्ष श्रीकृष्ण मते यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. मंत्रिमहोदयांनी मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्र्यांकडून मागण्या पूर्ण करून घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.
नेतृत्व : महेंद्र मेश्राम, व्यंकट बिरादार, देवदत्त साळवे, श्रीकृष्ण मते
मागण्या :
१) सन २०१२ च्या अर्धवेळ स्वरुपाच्या शासन निर्णयात शुद्धीपत्रक काढून पूर्णवेळ करण्यात यावे
२) ग्रामरोजगार सेवकांना ठराविक मासिक मानधन द्यावे
३) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ग्रामविकास मंत्रालयाशी जोडण्यात यावी
४) महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत पेरणी ते कापणीची कामे घेण्यात यावी