ग्राहकांना ३८.७० लाख रुपये अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 09:58 PM2018-08-21T21:58:25+5:302018-08-21T22:00:17+5:30
आयडिया सेल्युलर कंपनी व इतर संबंधितांच्या चुकीमुळे अज्ञात आरोपींनी आॅनलाईन व्यवहाराद्वारे दोन ग्राहकांच्या बँक खात्यांतून ३८ लाख ७० हजार रुपये लंपास केले. ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात यावी, असा आदेश माहिती व तंत्रज्ञान सचिवांनी कंपनी व इतरांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आयडिया सेल्युलर कंपनी व इतर संबंधितांच्या चुकीमुळे अज्ञात आरोपींनी आॅनलाईन व्यवहाराद्वारे दोन ग्राहकांच्या बँक खात्यांतून ३८ लाख ७० हजार रुपये लंपास केले. ती रक्कम ग्राहकांना परत करण्यात यावी, असा आदेश माहिती व तंत्रज्ञान सचिवांनी कंपनी व इतरांना दिला आहे.
राजकुमार सिंघी व नंदकिशोर गवारकर अशी ग्राहकांची नावे आहेत. त्यांचे वकील अॅड. महेंद्र लिमये यांनी मंगळवारी पत्रकारांना या प्रकरणाची माहिती दिली. हे दोन्ही ग्राहक आयडिया कंपनीचे सीम कार्ड वापरत होते. अज्ञात आरोपींनी हे ग्राहक वापरत असलेल्या क्रमांकाचे बनावट कागदपत्रांद्वारे दुसरे सीम कार्ड मिळविले. आरोपींना दुसरे सीम कार्ड देताना कंपनीने आवश्यक पडताळणी केली नाही. त्यानंतर ४ जुलै २०१६ रोजी आरोपींनी सिंघी यांच्या सारस्वत बँक, युनियन बँक आॅफ इंडिया व पंजाब नॅशनल बँकेतील बचत खात्यातून २६ लाख ७० हजार रुपये काढून घेतले. तसेच, गवारकर यांच्या सारस्वत बँकेतील खात्यातून १२ लाख रुपये चोरले. ही रक्कम कोलकाता येथील आयएनजी वैश्य बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, एचडीएफसी बँक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया इत्यादी बँकांतील खात्यात वळती करण्यात आली होती. त्यानंतर ती रक्कम काढून घेण्यात आली. दोन्ही ग्राहकांनी सुरुवातीला याची पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर भरपाई मिळण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान सचिवांकडे अर्ज दाखल केला होता. त्यांचा अर्ज मंजूर झाला.