वाहन विम्याचे ४.१६ लाख रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:07 AM2021-04-01T04:07:53+5:302021-04-01T04:07:53+5:30
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला वाहन विम्याचे ४ लाख १६ हजार ९१० रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश ...
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला वाहन विम्याचे ४ लाख १६ हजार ९१० रुपये ६ टक्के व्याजासह अदा करा, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नॅशनल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज १२ फेब्रुवारी २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कम नॅशनल इन्शुरन्स कंपनीनेच द्यायची आहे.
राजीव पंचमतीया असे ग्राहकाचे नाव असून, ते सिव्हिल लाईन्स येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. तक्रारीतील माहितीनुसार, पंचमतीया यांनी त्यांच्या कारचा नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून विमा काढला होता. विम्याची मुदत ४ जुलै २०१३ ते ३ जुलै २०१४ पर्यंत होती. ३१ जुलै २०१३ रोजी मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे संबंधित कार खराब झाली. तज्ज्ञांची मदत घेतल्यानंतरही कार सुरू होऊ शकली नाही. त्यामुळे पंचमतीया यांनी कंपनीला याची माहिती दिली. दरम्यान, कंपनीद्वारे नियुक्त सर्व्हेअरने कार दुरुस्तीसाठी ४ लाख १६ हजार ९१० रुपये खर्च येईल, असा अहवाल सादर केला. परंतु, कंपनीने १२ फेब्रुवारी २०१५ रोजी पंचमतीया यांना पत्र पाठवून कार दुरुस्ती खर्चाचा दावा नामंजूर केल्याचे कळवले. परिणामी, पंचमतीया यांनी ग्राहक आयोगात धाव घेतली होती.