आधी कर भरा, नंतर साफसफाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:07 AM2021-03-29T04:07:10+5:302021-03-29T04:07:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नरखेड : पिंपळगाव (राऊत) (ता. नरखेड) येथील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने डासांची पैदास वाढली आहे. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : पिंपळगाव (राऊत) (ता. नरखेड) येथील नाल्यांची साफसफाई करण्यात न आल्याने डासांची पैदास वाढली आहे. त्यामुळे कीटकजन्य आजार डाेके वर काढण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसेच दुर्गंधी सुटत असल्याने स्थानिक नागरिकांनी ग्रामसेवकाकडे नाल्या साफ करण्याची विनंतीवजा मागणी केली. त्यावर ग्रामसेवकाने आधी घरकर भरा, नंतर नाल्यांची साफसफाई केली जाईल, असे उत्तर दिले. अडचणीच्या काळात कराचा भरणा करण्यासाठी रक्कम आणायची कुठून, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.
वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेना संक्रमणामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकाला चार महिने घरात बसून राहावे लागले तर अनेकांचे राेजगार केले. यातून निर्माण झालेल्या आर्थिक संकटांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना जगणे व त्यांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण कठीण झाले. या काळात अनेकांना घर कर, पाणी कर, विजेची बिले भरणे शक्य न झाल्याने त्यांच्याकडे कर व विजेची बिले थकीत राहिली. याला पिंपळगाव (राऊत) येथील नागरिकही अपवाद नाहीत.
साफसफाईअभावी गावातील नाल्या तुंबल्याने तसेच डासांची पैदास वाढत असल्याने पंकज निंबुरकर, शेखर राऊत यांच्यासह इतर नागरिकांनी त्याच्या परिसरातील नाल्यांची साफसफाई करण्याची ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागणी केली. ग्रामसेविका सीमा बागडे यांनी नागरिकांची तक्रार स्वीकारून घेत जाेपर्यंत कराचा भरणा केला जात नाही ताेपर्यंत नाल्यांची साफसफाई केली जाणार नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे या नागरिकांनी पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केली. यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामसेविका सीमा बागडे यांच्याशी माेबाईलवर संपर्क हाेऊ शकला नाही. वृत्त लिहिस्ताे या प्रकरणात काेणताही ताेडगा काढण्यात आला नव्हता.