‘ओटीपी’ देणे पडले महागात; बँकेच्या अधिकाऱ्यांशी बोलत असतानाच साडेतीन लाख ‘ट्रान्सफर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2023 11:00 PM2023-05-18T23:00:05+5:302023-05-18T23:00:32+5:30
Nagpur News एका सेवानिवृत्त महिलेला बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून बोलणाऱ्या अज्ञात सायबर गुन्हेगारांना ओटीपी देणे चांगलेच महागात पडले.
नागपूर : एका सेवानिवृत्त महिलेला बँकेचा अधिकारी असल्याची बतावणी करून बोलणाऱ्या अज्ञात सायबर गुन्हेगारांना ओटीपी देणे चांगलेच महागात पडले. महिलेला शंका आल्याने ती बँकेत गेली व बँकेच्या अधिकाऱ्यांशी आरोपीचे बोलणे करून देत असतानाच तिच्या खात्यातून जवळपास चार लाख रुपये ट्रान्सफर झाले. आश्चर्याची बाब म्हणजे सायबर गुन्हेगारांनी महिलेच्या ‘एफडी’वरदेखील पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले. मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शोभा प्रभाकर काळे (वय ५७, मानकापूर) असे संबंधित महिलेचे नाव आहे. त्यांना फेब्रुवारी महिन्यात एका व्यक्तीचा फोन आला व एसबीआयचा व्यवस्थापक सुमित कुमार बोलत असल्याचे सांगितले. त्याने केवायसी अपडेट करायची असल्याची बतावणी केली व तपशील मागितले. मात्र, अशा माध्यमातून फसवणूक होत असल्याची माहिती असल्याने काळे यांनी त्याला माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, त्याने अतिशय विनम्रतेने संवाद साधत बँकेतूनच बोलत असल्याचा विश्वास दिला व काळे यांनी त्याला ‘ओटीपी’ दिला.
यानंतर काळे यांनी त्याच दिवशी दुपारी एसबीआयच्या मानकापूर शाखेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी असा कुठलाही व्यवस्थापक नसल्याचे त्यांना कळाले. इतर शाखेत असू शकतात असे काउंटरवरील कर्मचाऱ्यांनी सांगितले व फोन लावण्याची सूचना केली. सायबर गुन्हेगाराशी काळे यांनी कर्मचाऱ्यांचे बोलणे करवून दिले. त्याने तो बँक ऑफ महाराष्ट्रमधून बोलत असल्याचे सांगितले. बँकेचे नाव कसे काय बदलले अशी कर्मचाऱ्याने विचारणा केली असता त्याच वेळी त्याने काळे यांच्या दोन खात्यांतून आठ वेळा एकूण ३.९७ लाख रुपये दुसरीकडे वळते केले. त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांच्या घरी बँक ऑफ महाराष्ट्रच्या खात्याचे चेकबुक आले. कुठलेही चेकबुक मागविले नसल्याने त्यांनी विचारणा केली असता एफडीवर पाच लाखांचे कर्ज घेण्यात आल्याची बाब त्यांना कळाली. सायबर गुन्हेगारांनी दोनदा फसवणूक केली व एकूण ८.९७ लाखांनी गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी मानकापूर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी अज्ञात गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.