वीज बिल भरणे आता अधिक सुलभ : पेमेंट वॉलेटचा पर्याय उपलब्ध, अतिरिक्त उत्पन्नही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 09:47 PM2019-07-12T21:47:16+5:302019-07-12T21:48:47+5:30

वीज बिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे पाच रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल.

Payment of electricity bills is now more accessible | वीज बिल भरणे आता अधिक सुलभ : पेमेंट वॉलेटचा पर्याय उपलब्ध, अतिरिक्त उत्पन्नही

वीज बिल भरणे आता अधिक सुलभ : पेमेंट वॉलेटचा पर्याय उपलब्ध, अतिरिक्त उत्पन्नही

googlenewsNext
ठळक मुद्देमहावितरणचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषत: ग्रामीण भागात वीज बिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रती बिल पावतीमागे पाच रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळेल.
वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी आधार कार्ड, पॅनकार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या संकेतस्थळावरील लिंकवर अपलोड करून ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. अर्जदारांच्या अर्जाची व जागेची पडताळणी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडून विनाशुल्क केली जाईल. तर मुंबईस्थित मुख्य कार्यालयाकडून अर्जांना मंजुरी मिळणार आहे. त्यासाठीचा सर्व पत्रव्यवहार नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमांकावर केला जाईल. अर्जदाराला स्वत:हून महावितरणच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. मुख्य कार्यालयाकडून अर्जाला मंजुरी मिळाल्यानंतर सुरुवातीला किमान पाच हजार रुपयांचे वॉलेट रिचार्ज व त्यानंतर एक हजार रुपयांच्या पटीत रिचार्ज करावे लागेल. डेबिट व क्रेडिट कार्ड तसेच ऑनलाईन बँकिंगच्या आधारे वॉलेट रिचार्ज करता येईल.
वॉलेटधारक महावितरणच्या अ‍ॅपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर भरणा जमा झाल्याचा एसएमएस तत्काळ मिळणार असल्याने ग्राहकांचे जागेवर समाधान होऊ शकेल. एकाचा वॉलेटचा बॅलेन्स वापरून विविध लॉगीनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीज बिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा वॉलेटमध्ये देण्यात आली असून याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, छोटे-मोठे व्यापारी, बचत गट, वीज मीटर रिडींग व बिलवाटप एजन्सी वॉलेटधारक होऊ शकतात. वॉलेटधारकास प्रती एका बिलामागे पाच रुपये कमिशन मिळणार असून महिना अखेरीस ते वॉलेटमध्ये जमा करण्यात येईल.

Web Title: Payment of electricity bills is now more accessible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.