‘जय’ च्या चौकशीसाठी पथक दाखल पीसीसीएफची घेतली भेट :
By admin | Published: January 21, 2017 02:34 AM2017-01-21T02:34:49+5:302017-01-21T02:34:49+5:30
उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे
नागपूर : उमरेड-कऱ्हांडला येथून अचानक गायब झालेल्या ‘जय’ या वाघाच्या चौकशीसाठी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उच्चस्तरीय पथक शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहे. या पथकात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे (एनटीसीए) बेंगळुरू येथील इन्स्पेक्टर जनरल आॅफ फॉरेस्ट (आयजी) पी. एस. सोमशेखर, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोचे सहसंचालक व देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थानचे वैज्ञानिक कमर कुरेशी यांचा समावेश आहे.
माहिती सूत्रानुसार या पथकाने शुक्रवारी दुपारी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्री. भगवान यांची भेट घेऊन त्यांच्याशी ‘जय’ च्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली. शिवाय उद्या शनिवारी हे पथक उमरेड-कऱ्हांडला व तेथून नवेगाव-नागझिरा येथील दौरा करणार असल्याची माहिती आहे.
पुढील २२ जानेवारीपर्यंत हे पथक ‘जय’ संबंधीच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची चौकशी करणार आहे. तसेच २३ जानेवारी रोजी नागपुरात परत येणार असून, सायंकाळी दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. दिल्ली येथे पोहोचल्यानंतर पथक आपला चौकशी अहवाल दिल्ली येथील एनटीसीएच्या मुख्यालयाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे सादर करणार आहे.
विशेष म्हणजे, ‘जय’ हा मागील वर्षी १८ एप्रिलपासून अचानक गायब झाला असून, त्याचा अजूनपर्यंत कुठेही सुगावा लागलेला नाही. त्याचवेळी खासदार नाना पटोले यांनी ‘जय’ चा मुद्दा थेट संसदेत उपस्थित करू न, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते.
त्यावर केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री अनिल दवे यांनी ‘जय’ च्या चौकशीसाठी विशेष पथक स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) ही चौकशी समिती स्थापन केली असल्याचे सांगितले जात आहे. (प्रतिनिधी)