इलेक्ट्रॉनिक्स मार्केट हल्ल्यातील आरोपींना पीसीआर
By admin | Published: October 29, 2015 03:21 AM2015-10-29T03:21:45+5:302015-10-29T03:21:45+5:30
सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांचा ....
नागपूर : सीताबर्डीतील तेलीपुरा इलेक्ट्रॉनिक्स मार्केट येथील सशस्त्र हल्ला प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी सहा जणांना अटक करून त्यांचा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ओ. एन. मंत्री यांच्या न्यायालयातून ३१ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला. किशोर प्रल्हाद कुळकर्णी ऊर्फ कुत्तरमारे(४५) रा. द्वारकापुरी, काश किशोर कुळकर्णी ऊर्फ कुत्तरमारे (२०), संजय ऊर्फ कटप्पा अमरनाथ पाल (२१) रा. भगवाननगर, कांचन दिनेश पाल (२५) रा. पार्वतीनगर, विवेक ऊर्फ विक्की वसंता मेश्राम (२१) रा. कुकडे ले-आऊट, शिवदत्त नरेश कनोजिया (१८) रा. पार्वतीनगर, अशी आरोपींची नावे आहेत.
हल्ल्याची ही घटना २६ आॅक्टोबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली होती. तेलीपुरा मार्केटमधील देवगडे भवनमध्ये प्रशांत घनश्याम नानवाणी यांचे तिरुपती इलेक्ट्रॉनिक्स नावाचे दुकान आहे. या ठिकाणाहून २४ आॅक्टोबर रोजी किशोर कुत्तरमारे आणि त्याचा मुलगा काश कुत्तरमारे यांनी पेन ड्राईव्ह खरेदी केला होता. तो खराब निघाल्याने आरोपींनी दुकान मालकाला तो बदलवून मागितला असता मालकाने नकार दिला होता. त्यामुळे आरोपी रागात निघून गेले होते. रात्री ९ वाजता काश याने आपले साथीदार आणून या दुकानावर सशस्त्र हल्ला करून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. घनश्याम नानवाणी यांच्यावर तलवारीने हल्ला केला होता. बचाव पक्षाने पोलीस कोठडी रिमांडला विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपींना ३१ आॅक्टोबरपर्यंत ठेवण्याचा आदेश दिला. न्यायालयात आरोपींच्या वतीने अॅड. प्रफुल्ल मोहगावकर, अॅड. विलास सेलोकर, अॅड. लुबेश मेश्राम, अॅड. जयश्री हेडाऊ यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)