सक्करदरा हत्याकांडातील आरोपींना पीसीआर
By admin | Published: September 11, 2016 02:28 AM2016-09-11T02:28:25+5:302016-09-11T02:28:25+5:30
सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची हत्या करणाऱ्या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून...
नागपूर : सक्करदऱ्यातील कुख्यात गुंड आशिष संजय राऊत (वय २४) याची हत्या करणाऱ्या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, कोर्टातून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला.
हैदरखान नामक मित्रासोबत खंडणी वसुलीसाठी आलेल्या कुख्यात आशिष राऊतवर शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास सारंग नरेश पुट्टेवार (३५), त्याचा भाऊ ऋषी, शंकर गणपतराव शिरपूरकर (४२) या तिघांनी चाकूचे सपासप घाव घातले. नंतर त्याला दगडानेही ठेचले. कमला नेहरू महाविद्यालयाजवळच्या बुधवारी बाजारात दिवसाढवळ्या झालेल्या या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडवून दिली होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर राबणाऱ्या छोट्या दुकानदारांकडून कुख्यात आशिष खंडणी वसूल करायचा. त्यांना शिवीगाळ करून मारहाणही करायचा त्यामुळे त्याच्याबद्दल उपरोक्त आरोपींसह अनेकांच्या मनात तीव्र रोष होता. शुक्रवारी दुपारी याच कारणामुळे आशिषची हत्या झाली. त्यानंतर सक्करदरा पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा १४ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला.(प्रतिनिधी)
नंदनवनमध्येही चौघांना अटक
नंदनवन-खरबी मार्गावर सुदेश ऊर्फ मायकेल दिनेश राऊत (वय २४, रा. खरबी) या गुंडावरही इब्राहिम खान त्याचा भाचा सलीम अली, मोहसीन लल्ला, सोनू आणि सलमानने प्राणघातक हल्ला चढवला होता. आरोपींनी घातक शस्त्राने सुदेशच्या पार्श्वभागावर घाव घातले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तो कोमात गेला असून, नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी इब्राहिम, सलीम आणि मोहसीनला अटक केली. त्यांना कोर्टात हजर करून त्यांचा चार दिवसांचा पीसीआर मिळवला. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे.