धान्याची काळाबाजार करणाऱ्यांचा पीसीआर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:11 AM2021-03-09T04:11:10+5:302021-03-09T04:11:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गोरगरिबांच्या हक्काचे धान्य गिळंकृत करून त्याची खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आरोपींची पोलीस कोठडी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरगरिबांच्या हक्काचे धान्य गिळंकृत करून त्याची खुल्या बाजारात विक्री करणाऱ्या रॅकेटमधील आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने आणखी दोन दिवस वाढवून दिली. ‘लोकमत’ने या संबंधाने आज वृत्त प्रकाशित केल्याने रॅकेटमध्ये एकच खबळबळ उडाली. त्यानंतर आरोपींच्या बचावासाठी काहीजण मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे पुढच्या काही तासांत धक्कादायक घडामोडी घडण्याचे संकेत मिळाले आहेत.
रेशनच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्या नागपुरातील रॅकेटचे नेटवर्क महाराष्ट्र, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातही आहे. या रॅकेटमधील समाजकंटक सरकारकडून गोरगरिबांसाठी दिले जाणारे शेकडो टन धान्य सरकारी गुदामातून बाहेर काढतात. त्यातील २५ ते ३० टक्के धान्य राशनच्या दुकानात पोहोचते. उर्वरित धान्याला भंडारा, तुमसर, गोंदियासह ठिकठिकाणच्या मिलमध्ये पॉलिश करून ते नागपूर, महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये पोहोचवले जाते. त्याची नंतर खुल्या बाजारात सर्रास विक्री केली जाते. धान्याच्या या काळाबाजारातून कोट्यवधी रुपये गोळा करणारे हे समाजकंटक स्वत:च्या तुंबड्या भरतात. या रॅकेटशी संबंधित असलेल्या पारडीतील कुख्यात दिनेश आणि प्रदीप रामभाऊ आकरे याच्या निवासस्थानी गुन्हे शाखेने छापा मारून तेथून गुरुवारी सरकारी धान्याची ४४२ पोती तसेच ट्रक जप्त केला. कुख्यात आकरे बंधूंसह जागोजी ढोबळे, बन्शी राऊत आणि अण्णा ऊर्फ वैभव जितेंद्र रेवतकर या पाच जणांना अटक केली. ते तेव्हापासून पोलीस कोठडीत आहेत. मात्र, पाच दिवस होऊनही तपास रेंगाळल्यासारखा झाला आहे. या रॅकेटचे सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. रॅकेटमधील महत्त्वाचे मोहरे हातात असूनही पोलीस पाच दिवसांपासून रॅकेटच्या सूत्रधारांपर्यंत किंवा सहाव्या आरोपींपर्यंत पोहचू शकले नाहीत. त्यामुळे सूत्रधारांना कधी अटक होणार, असा प्रश्न सर्वसामान्यात चर्चेला आला आहे. लोकमतने या संबंधाने सोमवारच्या अंकात ठळकपणे वृत्त प्रकाशित केले. त्याची सर्वत्र चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर, पारडी पोलिसांनी सोमवारी आरोपी आकरेबंधू आणि साथीदारांना न्यायालयात हजर करून त्यांच्या पीसीआरची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची कागदपत्रे बघून दोन दिवसांचा वाढीव पीसीआर मंजूर केला. त्यानंतर आरोपींच्या बचावासाठी काही जण मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळे पुढच्या काही तासांत धक्कादायक घडामोडीचे संकेत मिळाले आहेत.
---
सरकारी यंत्रणेकडे विचारपूस
‘लोकमत’च्या वृत्तामुळे दडपण आल्यानंतर संबंधित वर्तुळात सोमवारी दिवसभर धावपळ सुरू होती. दुसरीकडे पोलिस अधिकाऱ्यांनी रॅकेटची महत्त्वाची कडी असलेल्या सवयीबाबतही विचारणा सुरू केल्याने संबंधितांमध्ये चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांना आणखी दोन दिवस पीसीआरच्या रूपात मिळाल्याने पोलीस या रॅकेटमधील सूत्रधारांची मानगुट पडकतात की या रॅकेटमध्ये पाचच आरोपी आहे, हे समजून तपासाची फाइल बंद करतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
---