वाडी नगराध्यक्ष झाडेंचा पीसीआर : घरझडतीत सापडले २६ हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 09:40 PM2019-05-18T21:40:01+5:302019-05-18T21:41:12+5:30
२० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झाडे यांना लाच स्वीकारताना पकडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेलेले भाजपचे नेते आणि वाडी नगर परिषदेचे अध्यक्ष प्रेमनाथ झाडे यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश कोर्टाने दिले. शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) झाडे यांना लाच स्वीकारताना पकडले होते.
वाडी नगर परिषदेत एका खासगी संस्थेने तीन स्थापत्य अभियंत्याचा पुरवठा केला होता. त्यांचे चार महिन्यांचे वेतन प्रलंबित होते. ते काढून देण्यासाठी संस्थाचालकांनी झाडे यांच्याशी संपर्क साधला होता. झाडे यांनी वेतन काढून देण्याच्या बदल्यात २४ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. संस्थाचालकाने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला १६ मे रोजी तक्रार दिली होती. शहानिशा केल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रचलेल्या सापळ्यानुसार, संस्थाचालक आणि झाडे यांच्यात २० हजार रुपये लाच देण्याचे निश्चित झाले. त्यानुसार लाचेची रक्कम घेऊन तक्रारदार झाडे यांच्याकडे शुक्रवारी सकाळी १० वाजता पोहचले. त्यांच्याकडून झाडे यांनी लिफाफ्यातील (पाकीट) लाचेची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने झाडेंना पकडले. या कारवाईनंतर झाडे यांच्या बंगल्याची तर एसीबीच्या दुसºया पथकाने त्यांच्या कार्यालयातील कक्षाची तपासणी सुरू केली. तपासणीत २६ हजार रुपये आणि झाडे यांच्याशी संबंधित फर्मची कागदपत्रे एसीबीच्या हाती लागली. ती जप्त करण्यात आली. त्यांची प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. तपास अधिकारी एसीबीचे (भंडारा) उपअधीक्षक महेश चाटे यांनी न्यायालयात बाजू ठेवताना झाडे यांच्या पीसीआरची मागणी केली. झाडे यांनी संबंधित प्रकरणात कसा कंत्राट केला होता, त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रामागे काय आहे, ते जाणून घेण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे एसीबीतर्फे सांगण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून झाडेंना दोन दिवसांची कोठडी मंजूर केली. दरम्यान, या घडामोडीमुळे झाडे यांच्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.