पहिल्यांदाच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 09:40 PM2019-08-27T21:40:36+5:302019-08-27T21:42:57+5:30
स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वातंत्र्यानंतर पहिल्यादांच चणा डाळीपेक्षा वाटाणा डाळ महाग विकण्यात येत आहे. मुंबई पोर्टवर आयातीत चण्याचे भाव ४२०० रुपये तर चण्याचे क्विंटल भाव ४२०० रुपये आहेत.
दोन ते तीन वर्षांपूर्वी कॅनडा आणि युके्रनमधून वाटाण्याची मोठ्या प्रमाणात आयात व्हायची. वाटाणा ठोकमध्ये २००० ते २२०० रुपये आणि डाळ २६०० ते ३००० रुपये क्विंटल विकण्यात येत होती. त्यामुळे शेतकऱ्यांना भाव मिळत नव्हता. परिणामी शेतकऱ्यांनी लागवड कमी केली आणि पीक कमी आले. देशात दरवर्षी ४ लाखांपर्यंत वाटाण्याची आयात व्हायची. पण केंद्र सरकारने आयातीवर ५० टक्के, नंतर १०० टक्के आयात शुल्क आणि यावर्षी वार्षिक १.५ लाख टनापर्यंत निर्बंध लावले. एकीकडे उत्पादन कमी आणि दुसरीकडे आयातीवर निर्बंध लावल्यामुळे देशात वाटाण्याची उपलब्धता कमी आहे. त्यामुळे वाटाणा डाळीचे क्विंटल भाव ठोक बाजारात ५८०० ते ६००० रुपयांवर पोहोचले आहेत. त्या तुलनेत चणा डाळ प्रति क्विंटल ५२०० रुपये क्विंटल विकल्या जात असल्याची माहिती इतवारी ग्रेन मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.
पूर्वी चणा डाळ महाग झाल्यानंतर वाटाणा डाळीच्या किमती वाढत नव्हत्या. भाव वाढल्यानंतरही किंमत प्रति क्विंटल २८०० ते ३३०० रुपयांच्या आतच राहायची. तसेच चणा डाळ महाग असल्यामुळे त्याला पर्याय म्हणून पदार्थ तयार करण्यासाठी स्वस्त वाटाणा डाळीचा जास्त उपयोग करण्यात येत होता. त्यामुळे लोकांना अनेक वर्षांपासून वाटाणा डाळीची सवय झाली. गावखेडे आणि तालुक्यात याच डाळीची जास्त विक्री व्हायची. सध्या दोन्ही डाळीत ७०० ते ८०० रुपयांचा फरक असतानाही हॉटेलचालक ग्राहकांच्या चवीसाठी वाटाणा डाळीचेच पदार्थ तयार करीत आहेत. त्यामुळे चणा डाळीच्या तुलनेत वाटाणा डाळीला जास्त मागणी आहे. चण्याचे आधारभूत मूल्य ४६५० रुपये असतानाही बाजारात प्रति क्विंटल ४४०० रुपयांत विक्री होत असल्याचे मोटवानी यांनी सांगितले.
मोटवानी म्हणाले, सणांच्या हंगामात बाजारात मंदीचे वातावरण आहे. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांच्या सततच्या वक्तव्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. बाजारात तेजी नसतानाही जमाखोरी, साठ्यावर नियंत्रण, सरकार आपल्याकडील माल विकणार, अशी वक्तव्ये त्यांनी केली आहेत. सरकार आता व्यवसायातही हस्तक्षेप करीत आहेत. सरकारने व्यवसायात हस्तक्षेप करणे बंद करावा, अशी मागणी मोटवानी यांनी केली.