बुद्ध तत्त्वज्ञानातच प्रगतीचे शिखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 11:49 AM2019-08-30T11:49:42+5:302019-08-30T11:51:12+5:30
तथागत बुद्धाच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवस्थेसोबत चालत आलेली दृष्टी व जीवनशैली नाकारून नव्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करण्याची आज गरज आहे. हाच तथागत बुद्धाने सांगितलेला जीवनमार्ग आहे. त्यांच्या विचारांवर चालल्यास प्रगतीचे शिखर गाठता येईल व जीवन सुखमय करता येईल, असा धम्मसंदेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष व बौद्ध धम्मगुरू भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी दिला.
इंदोरा बुद्ध विहार येथे जन्मदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी हा धम्मसंदेश बौद्ध अनुयायांना दिला आहे. कोंडीत सापडलेल्या श्वासांना मुक्त करण्यासाठी डॉ. बाबासाहेबांचे विचार आत्मसात करा व जगभरात प्रेरणा निर्माण करा. माणूस कितीही मोठा बुद्धिवंत असला आणि इतरांचा द्वेष करीत असला तरी तो उजेडात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्यासारखा असतो. म्हणून कुणाचाही द्वेष करू नका, प्रेम करा व प्रेमाची फुले निर्माण करा; कारण जगाला आज बुद्धाच्या शांतता, करुणा व प्रज्ञेची खरी गरज आहे.
आयुष्यात हजारो लढाया जिंकण्यापेक्षा स्वत:वर विजय मिळविणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा विजय होईल व तो तुमच्याकडून कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. वाईटाने वाईटावर मात करता येऊ शकत नाही.
तिरस्कार केवळ प्रेमानेच संपविला जाऊ शकतो, असे विचार त्यांनी दिले. आयुष्यात हिंसाचाराला स्थान नको. नेहमी रागात राहणे म्हणजे जळलेला कोळसा दुसऱ्यावर फेकण्यासाठी स्वत:च्या हातात ठेवण्यासमान आहे. हा राग सर्वात आधी तुम्हालाच भस्मसात करतो. तुम्ही चांग
ल्या पुस्तकांचे वाचन करता, त्यातील विचार आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही. हजारो पोकळ शब्दांपेक्षा एक चांगला शब्द महत्त्वाचा आहे.
जग सध्या संकुचनाच्या मार्गावर चालत आहे. यामुळे विश्वावर युद्धाचे ढग जमा होत आहेत. पण जगाला युद्ध नको, बुद्ध हवा, असा संदेश देत भदंत सुरई ससाई यांनी बुद्ध व बाबासाहेबांच्या विचाराने स्वत:च्या अंतरंगातील दीप चेतविण्याचे आवाहन या धम्मसंदेशात केले.