मुकाट्याने ३ हजारांचा हफ्ता दे, नाही तर..; पोलिसांनी धमकी दिल्याचा फेरीवाल्याचा आरोप; वरिष्ठांकडे तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:41 PM2022-05-13T12:41:53+5:302022-05-13T12:50:34+5:30
पोलिसांकडून वारंवार छळवणूक होत असल्याने अखेर तक्रारीचे पाऊल उचलावे लागले असल्याची भूमिका तक्रारदाराने मांडली आहे.
योगेश पांडे
नागपूर : गुन्हा दाखल न करण्यासाठी वाठोडा पोलीस ठाण्यातील हेडकॉन्स्टेबलला एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली होती. हे प्रकरण शांत झाले नसताना पोलिसांनी हफ्तावसुलीसाठी मारहाण केल्याचा आरोप करत पोलीस उपायुक्तांकडेच तक्रार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून वारंवार छळवणूक होत असल्याने अखेर तक्रारीचे पाऊल उचलावे लागले असल्याची भूमिका तक्रारदाराने मांडली आहे.
बेरोजगार असल्यामुळे मंगेश सरोज यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा यासाठी रामदास पेठेतील निती गौरव कॉम्प्लेक्सजवळ हातठेला उभा करण्यास सुरुवात केली. सायंकाळी पाच ते रात्री अकरा या कालावधीत ते चहानाश्ताची विक्री करतात. या परिसरात रात्री दहा वाजेनंतर अनेकदा पोलिसांची गस्त असते. त्यामुळे वेळेत दुकान बंद करावेच लागते. एप्रिल महिन्यापासून सीताबर्डी पोलीस ठाण्यातील दोन हेडकॉन्स्टेबल्सने मंगेशकडे पैशांची मागणी सुरू केली. महागाई वाढत असून कुटुंबाला पोसणे कठीण जात असल्याने तुम्हाला पैसे देऊ शकत नाही, असे उत्तर दिल्यानंतर ६ मे रोजी रात्री साडेअकरा वाजता मला जोरदार मारहाण करण्यात आली. तसेच ८ मे रोजीदेखील परत बेदम मारहाण करण्यात आली व पोलीस व्हॅनमध्ये बसवून पंचशील चौकात सोडण्यात आले, असा दावा मंगेशने तक्रारीत केला आहे. हातठेला चालवायचा असेल तर आठवड्याला तीन हजारांचा हफ्ता दे. जर हफ्ता दिला नाही व हातठेला सुरू दिसला तर परत मारहाण करू, अशी धमकी त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिल्याचा आरोप मंगेशने केला आहे. या त्रासाला कंटाळून त्याने थेट पोलीस उपायुक्त कार्यालयातच तक्रार केली.
तथ्य तपासून पुढचे पाऊल
यासंदर्भात सीताबर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणातील तथ्य तपासून पुढचे पाऊल उचलण्यात येईल, असे स्पष्ट केले. सद्यस्थितीत मी बाहेरगावी आहे. परंतु माझ्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार तथ्य तपासणे गरजेचे आहे. अनेकदा रामदास पेठेत रात्री उशिरापर्यंत हातठेले सुरू असतात व तेथे गर्दी असते. कंट्रोल रुमला तक्रारी आल्यानंतर ठेले हटवायला गेल्यावर वाद होतात. त्यातून तर हा प्रकार झाला नाही, याचीदेखील चौकशी करण्यात येईल, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. यासंदर्भात पोलीस उपायुक्त डॉ. पखाले यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.