फेरीवाल्यांच्या हातात दमडीही नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:07 AM2021-05-09T04:07:48+5:302021-05-09T04:07:48+5:30
नागपूर : राज्य सरकारने लॉकडाऊन काळात फेरीवाल्यांना १,५०० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात शहरातील फेरीवाल्यांच्या यासंदर्भात प्रशासनाने ...
नागपूर : राज्य सरकारने लॉकडाऊन काळात फेरीवाल्यांना १,५०० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात शहरातील फेरीवाल्यांच्या यासंदर्भात प्रशासनाने याद्याही मागितल्या नाहीत किंवा खात्यात मदतही जमा झालेली नाही. यामुळे या मदतीसंदर्भात निव्वळ घोषणांचा बाजारच सुरू असल्याचे एकंदर स्थितीवरून दिसत आहे.
राज्य सरकारने स्ट्रीट व्हेंडर ॲक्ट अंतर्गत फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २०१६ मध्ये नागपुरात झालेल्या सर्वेक्षणात ४५ हजार फेरीवाले शहरात असल्याचे आढळले होते. या सर्वांची आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून घ्यायची होती. मात्र, फक्त ३,४०० जणांनीच यात नोंदणी केली आहे. त्यामुळे सध्या ३५ हजार असली तरी शासनापुढील आकडेवारी मात्र ३,४०० एवढीच आहे.
कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारने समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विविध घटकांना महिन्याला १,५०० रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले होते. नागपुरातील फेरीवाल्यांना अद्याप तरी यासंदर्भात कसलीही मदत मिळालेली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यासंदर्भात याद्या मागवलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या तरी कोणतीही प्रक्रिया पुढे सरकलेली दिसत नाही.
...
कोट
ही मदत ज्या कोणत्या योजनेच्या माध्यमातून देणार, त्यासंदर्भात आमच्याकडे गाईड लाईन आलेली नाही. जिल्हा प्रशासनाने फेरीवाल्यांच्या याद्या मागविलेल्या नाहीत. ३,४०० व्यक्तींची नोंदणी आमच्याकडे आहे.
- मिलिंद मेश्राम, उपायुक्त, मनपा, नागपूर
...
फेरीवाले म्हणतात...
१) सरकारने मदत देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आमच्या खात्यामध्ये शासनाच्या रकमेची मदत जमा झालेली नाही. लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय बंद पडला आहे. त्यामुळे अडचण होत आहे.
- रामप्रसाद, एक फेरीवाला
...
२) कोरोनामुळे ग्राहक फिरकत नाहीत. सकाळी ११ वाजेपर्यंत आम्ही हातठेले लावतो. मात्र, म्हणावे तसे ग्राहक येत नसल्याने उत्पन्न थांबले आहे. महिनाभरापासून ही परिस्थिती असल्याने कुटुंबासमोर संकट आहे.
- श्यामलाल, एक फेरीवाला
...
३) कोरोनापूर्वी व्यवसाय चांगला चालायचा. चनाचोर, खरमुरे या विक्रीवर कुटुंबाचा खर्च निघून जायचा. मात्र, आता विक्री होत नाही. दोन-तीन तासांत व्यवसाय पुरेसा होत नसल्याने कुटुंबाची गुजराण होत नाही. सरकारने मदत करावी.
- शंकरलाल त्रिवेदी, एक फेरीवाला
...
शहरात नोंदणीकृत फेरीवाले - ३,४००
नोंदणी नसलेल्यांची संख्या - ३५,०००
...