‘एक पादचारी, सब पे भारी ’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 09:24 PM2019-11-26T21:24:04+5:302019-11-27T00:04:22+5:30
वाहतुकीच्या नियमांचे आपण काटेकोर पालन करू या, चला सर्व मिळून आपण नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘एक पादचारी, सब पे भारी’ या उपक्रमाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाहतुकीच्या नियमांचे आपण काटेकोर पालन करू या, चला सर्व मिळून आपण नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचा संकल्प करू या, असे आवाहन करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी ‘एक पादचारी, सब पे भारी’ या उपक्रमाला सुरुवात झाल्याचे जाहीर केले.
वाहतूक शाखेच्या पोलिसांतर्फे ‘एक पादचारी, सब पे भारी’ हा उपक्रम आजपासून उपराजधानीत सुरू केला. अत्यंत वर्दळीच्या सीताबर्डी बाजारपेठेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत बाजारपेठेतील कोणत्याच फूटपाथवर आता दुकाने दिसणार नाहीत. फूटपाथ केवळ पायी चालाणाऱ्यांसाठीच २४ तास मोकळे राहतील. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय बोलत होते. मंचावर परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, माजी पोलीस अधिकारी चंद्रकांत उदगीकर, जमील शेख उपस्थित होते. यावेळी पोलीस आयुक्तांनी नागपूर शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याची संकल्पना मांडली. ते म्हणाले, रस्त्यांवर सर्वांचाच सारखा हक्क असला तरी पायी चालणाऱ्यांचा हक्क सर्वात जास्त आहे. याची जाणीव वाहनचालकांनी ठेवली तर अनेकांचे जीव सहीसलामत राहील आणि अपघातांची संख्याही कमी होईल. नागपूरला अपघातमुक्त शहर करण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेच. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे. एखादी व्यक्ती घरातून बाहेर पडते. घरची मंडळी त्यांची वाट बघत असते अन् त्यांना अपघाताची वार्ता कळते. अपघातानंतर त्या व्यक्तीचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. वृद्ध आई-वडील, पत्नी, मुले यांची प्रचंड हेळसांड होते. हा प्रकार व्यथित करणारा असला तरी अनेक जण तो गांभीर्याने घेत नाही. वाहन चालविताना रस्ता विकत घेतल्यासारखे वागतात. पायी चालणारे गरीब, वृद्ध, मुले यांना मार्ग देण्याऐवजी हट्टाने समोर वाहने आणतात. विदेशात असे होत नाही. रस्त्याने पायी चालत असलेल्या व्यक्तींचा तेथे आदर केला जातो. २०० फुटांवर वाहन थांबवून आधी तुम्ही जा, असे सांगून नंतरच वाहनचालक आपले वाहन पुढे नेतो. त्यामुळे विदेशात अपघाताचे प्रमाण कमी आहे. आमच्याकडे पायी चालणाऱ्यांना काही उद्दाम वाहनचालक तुच्छ समजतात. त्यांनी हे नेहमी लक्षात ठेवावे की, पायी चालणाऱ्यांचाही रस्त्यांवर तेवढाच हक्क आहे.
अशा वाहनचालकांवर कडक कारवाई करण्याचेही त्यांनी वाहतूक पोलिसांना सांगितले. दुसरे म्हणजे, पादचाºयांच्या हक्काचे फूटपाथ गिळंकृत करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही यापुढे फूटपाथ हे पायी चालणाऱ्यांच्याच हक्काचे आहे, याचे ध्यान ठेवण्याचा सल्ला दिला. फूटपाथ पादचाऱ्यांसाठी नेहमीच मोकळे असले पाहिजे, जे त्यावर कब्जा करतील, अशांवर वाहतूक शाखा पोलीस महापालिकेच्या मदतीने कारवाई करेल, असा इशाराही त्यांनी दिला. यावेळी उपायुक्त पंडित यांनी ‘एक पादचारी, सब पे भारी’या उपक्रमामागची संकल्पना विशद केली. तर, वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक जयेश भांडारकर यांनी फूटपाथवर कुणी दुकाने थाटू नये म्हणून महापालिकेने रेलिंग उभारावे, अशी सूचना केली. प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक पोलिसांनी फूटपाथ संरक्षित करण्यासाठी त्यावर रोप बांधल्याचे सांगितले.
अपघात होऊच नये!
नागपूरला अपघातमुक्त शहर करण्यासाठी पोलीस वेगवेगळे उपक्रम राबवीत आहेत. ‘एक पादचारी, सब पे भारी ’हा त्याच उपक्रमाचा एक भाग आहे. अशाच काही उपक्रमामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघातात ठार झालेल्यांची संख्या १९ ने कमी झाली. एखाद्या व्यक्तीचा प्राण वाचविण्यासारखे दुसरे पुण्य नाही. वाहतूक शाखेने १९ जणांचे प्राण वाचविले. पुढे ही संख्या जास्तीत जास्त वाढावी आणि भविष्यात नागपुरात एकही अपघात होणार नाही, यासाठी प्रयत्न करावे. प्रत्येक वाहनचालकासह नागरिकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास नागपूरला अपघातमुक्त शहर बनविण्याचा मान आम्ही सर्व नागपूरकर मिळवू शकतो, असेही पोलीस आयुक्त यावेळी म्हणाले.