जिल्हा परिषदेला हवेत बालरोग तज्ज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:37+5:302021-06-11T04:06:37+5:30
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांच्या आरोग्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा ...
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांच्या आरोग्याची चिंता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक तालुक्यात एक चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बालरोग तज्ज्ञांची जिल्हा परिषदेला गरज आहे. आरोग्य विभागाने त्यासाठी जाहिरातही दिली आहे. परंतु बाल रोग तज्ज्ञांकडून प्रतिसादच मिळत नसल्याची माहिती आहे.
दुसऱ्या लाटेत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयीसुविधाअभावी मोठ्या प्रमाणात जीवहानी झाली. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात आले. दुसऱ्या लाटेचा जोर आता हळुहळु ओसरतो आहे. पण तिसऱ्या लाटेचे भाकीत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे आणि ही लाट बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यातील प्रत्येकी एका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १० खाटांमध्ये चाईल्ड कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन केले आहे. जिल्हा आरोग्य विभागाने सीसीसीकरिता आवश्यक असलेल्या मेडिकल साहित्याच्या खरेदीसाठीची जवळपास ७ कोटीवरची निविदाही काढली आहे. याशिवाय लहान मुलांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेले बालरोगतज्ज्ञ (पेडीयाट्रीक), परिचारिका, अधिपरिचारिका आदी कंत्राटी पध्दतीने भरती करण्यासाठी अर्जही मागविले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आजवर बीएएमएस डॉक्टरचे ३, बीडीएस १, औषध निर्माण अधिकारी पदासाठी २, परिचारिका व अधिपरिचारिका पदासाठी ७५ वर अर्ज आले आहेत. परंतु एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेला नाही. विशेष म्हणजे, या कंत्राटी तत्त्वावरील डॉक्टरांना मानधनही तगडे देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु यानंतरही जि.प.च्या सीसीसीकरिता एकाही एमबीबीएस डॉक्टरने अर्ज केलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
- डॉक्टर नाही मिळाले तर
जिल्ह्यात १० बेडप्रमाणे १३० बेडचे सीसीसी उभारण्याचे नियोजन आहे. २० बेडसाठी ३ परिचारिका, १ बालरोगतज्ज्ञ (एमबीबीएस) अथवा २ (बीएएमएस) ची आवश्यकता भासणार आहे. परंतु जाहिरातीला मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, विभागाची डोकेदुखी वाढली आहे. प्रसंगी जि.प. आरोग्य विभागाला तालुकास्तरावरील डॉक्टरांना तासिका तत्त्वावरच सीसीसीमध्ये बोलवावे लागणार आहे.