कबुतरांसह चोरटा जेरबंद : नागपूरच्या पाचपावली पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:25 AM2019-05-18T00:25:48+5:302019-05-18T00:28:13+5:30
वर्षभरापूर्वी बेंद्यासह (घरटे) ५० कबूतर चोरणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अखेर अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षभरापूर्वी बेंद्यासह (घरटे) ५० कबूतर चोरणाऱ्या आरोपीला पाचपावली पोलिसांनी अखेर अटक केली. नईम शेख ऊर्फ बाबा शेख हसमत अली (वय २५, रा. नवीन वस्ती, सिद्धार्थनगर) असे आरोपीचे नाव आहे.
पाचपावलीतील नसिम शेख मोहम्मद बसिर शेख (वय ४०) याला कबूतर पाळण्याचा शौक आहे. त्याच्याकडे मोठ्या संख्येत कबूतर असून तो त्यांची देखभालही व्यवस्थित करतो. घराच्या छतावर त्याने कबुतरांसाठी छोट्या कप्प्यांचा लाकडी बेंदा तयार केला होता. त्यात त्याची कबुतरे राहायची. १९ मार्च २०१८ ला बेंद्यातून ५० कबुतर चोरीला गेले. ११० कबुतरांपैकी ५० कबुतर चोरीला गेल्याने नसिम अस्वस्थ झाला. त्याने २० मार्चला पाचपावली पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, पशुपक्ष्यांच्या चोरीकडे पोलीस फारसे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे या चोरीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले. दरम्यान, प्रलंबित गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पाचपावलीचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी ठाण्यातील सर्व फाईल्स तपासणे सुरू केले आहे. त्यात त्यांना कबूतर चोरीचा गुन्हा प्रलंबित दिसला. त्यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांना या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी कामी लावले. त्यानुसार, एपीआय संजय सुरोशे, हवलदार रामेश्वर कोहळे, संतोष ठाकूर, अभय साखरे, शैलेंद्र चौधरी, राज चौधरी, नितीन धकाते आदींनी धावपळ करून कबूतर चोर नईम शेख याला अटक केली. त्याच्याकडून चोरलेल्या ५० पैकी २० कबुतर तसेच गुन्ह्यात वापरलेली अॅक्टीव्हा जप्त करण्यात आली.