सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या ५२ लोकांवर दंडात्मक कारवाई
By मंगेश व्यवहारे | Published: January 24, 2024 03:55 PM2024-01-24T15:55:43+5:302024-01-24T15:56:01+5:30
महापालिकेने सुरू केली मोठी कारवाई.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्या प्रकरणी ५२ लोकांवर कारवाई करून ३८,००० रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानदारांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे.
हातगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता केल्याने २४ लोकांवर कारवाई करण्यात आली. मॉल, उपहारगृह,लॉजिंग बोर्डिंग होर्डिंग सिनेमाहॉल, मंगल कार्यालये, कॅटरर्स सर्व्हिस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकल्याने ३ प्रकरणात कारवाई करून ६००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज टाकून अडविल्याने ८ लोकांवर कवारई करून १०,००० रुपयांची वसुली करण्यात आली.