सहायक आयुक्तांवर दंडात्मक कारवाई
By admin | Published: September 29, 2015 04:37 AM2015-09-29T04:37:17+5:302015-09-29T04:37:17+5:30
माहिती अधिकारात मागितलेली माहिती निर्धारित कालावधीत न दिल्याने अपीलकर्त्याला झालेल्या त्रासाबद्दल दोन
नागपूर : माहिती अधिकारात मागितलेली माहिती निर्धारित कालावधीत न दिल्याने अपीलकर्त्याला झालेल्या त्रासाबद्दल दोन हजाराची नुकसान भरपाई देण्याचे आदेश नागपूर खंडपीठाचे माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे यांना दिले. तसेच माहिती पुरविण्यास विलंब केल्याप्रकरणी कलम २०(१)नुसार शास्ती का लादण्यात येऊ नये, याबाबत ३० दिवसात खुलासा करण्याचे निर्देश दिले आहे.
धरमपेठ येथील सामाजिक कार्यकर्ते महेश पाली यांनी धरमपेठ येथील दाता हनुमान मंदिराच्या बाजूला अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या सांस्कृतिक हॉलसंदर्भात मनपाच्या धरमपेठ झोनकडे तक्रार केली होती. त्या तक्र ार अर्जावर कोणत्या स्वरूपाची कार्यवाही करण्यात आली, याबाबत त्यांनी माहिती अधिकारात माहिती मागितली होती. परंतु मागितलेली माहिती कार्यालयाच्या अभिलेखात उपलब्ध नसल्याचे त्यांना कळविण्यात आले होते.
त्याआधारे पाली यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर ३ फेबु्रुवारी २०१५ रोजी सात दिवसात माहिती देण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पाली यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे कारण नमूद करून राज्य माहिती आयोगाकडे अपील केले होते.
या सुनावणीला जनमाहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी अनुपस्थित होते. जनमाहिती अधिकारी यांनी दिलेल्या दोन पत्रात विसंगती असल्याचे माहिती आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी दंडात्मक कारवाई व ३० दिवसात खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे. (प्रतिनिधी)