कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांना दंड करा : पालकमंत्र्यांचे जनसंवाद कार्यक्रमात निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 09:08 PM2019-02-04T21:08:50+5:302019-02-04T21:09:25+5:30
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. असे असतानाही वस्त्यात वा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना दंड आकारण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले.
जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी महापालिकेच्या धरमपेठ झोनमध्ये पालकमंत्र्यांचा जनसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, आमदार,सुधाकरराव देशमुख,अपर आयुक्त राम जोशी, नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रगती पाटील, निशांत गांधी, जगदीश ग्वालबंशी, रूपा रॉय, संजय बंगाले,वर्षा ठाकरे, सभापती प्रमोद कौरती व अन्य नगरसेवक उपस्थित होते.
झोनच्या कार्यक्षेत्रातील गडरलाईनची दुरुस्ती, नवीन गडरलाईन टाकणे, रस्त्यांची दुरुस्ती व अन्य नागरी सुविधांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांचा १५ ते २० कोटींचा प्रस्ताव तयार करा, या कामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्याची ग्वाही बावनकुळे यांनी दिली.
जनसंवाद कार्यक्रमात ७१ तक्रारी नोंदविल्या होत्या. या तक्रारींवर समोरासमोर सुनावणी घेत अधिकाऱ्यांना निर्धारित कालावधीत निपटारा करण्याचे निर्देश दिले. केटीनगर येथील कोलवाडकर यांनी विश्रामगृहाच्या फूटपाथवर अतिक्र मण असल्याची तक्रार केली. यावर अतिक्रमण करणाऱ्यांचे साहित्य जप्त करून पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले. दिनकर पिल्लेवान यांनी अनधिकृत बांधकाम व होर्डिंगची तक्रार केली. गरीश मुंदडा यांनी हिंदुस्थान कॉलनी येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याची तक्रार केली. मधुकर शेलार यांनी तेलीपुरा येथील कचरा घरासंदर्भात तक्रार केली. श्याम ताम्हणकर यांनी बुटी रोड येथील नाल्याच्या काठावरील अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आणले. अखिल विश्व हाऊ सिंग सोसायटी येथील नागरिकांनी पथदिवे, रस्ते व गडर लाईन नसल्याबाबत तक्रार केली. पालकमंत्र्यांनी १५ दिवसात पथदिवे लावण्याचे निर्देश विद्युत विभागाला दिले.
नागरिकांनी सुमारे वर्षभरापासून अतिक्रमण हटविण्यासाठी अर्ज केले होते. भाजीपाल्याच्या दुकानांचे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्याच्या तक्रारीही करण्यात आल्या. वस्त्यांमध्ये करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारींवर आठवडाभरात निर्णय घेऊन कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. रहिवासी भागात अनधिकृत इमारत उभी करून त्याचा व्यावसायिक वापर करण्याविरोधात १५ दिवसात कारवाईचे आश्वासन झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी दिले.
झोनअंतर्गत केबलसाठ़ी करण्यात आलेले खड्डे बुजवले जात नाहीत, तसेच नाल्याच्या काठावर बांधण्यात आलेले अतिक्रमण हटविण्याची मागणी या कार्यक्रमात करण्यात आली. त्यावरही आठ दिवसात कारवाईचे निर्देश दिले गेले. नगर भूमापन विभागाच्या नामांतरणाच्या तक्रारी समोर आल्या. पण जनसंवाद कार्यक्रमात त्यावर कारवाई आधीच झाल्याचे सांगण्यात आले. गिट्टीखदान भागात गडरलाईनच्या अनेक समस्या समोर आल्या. याशिवाय मालकी हक्काचे पट्टे मिळत नसल्याच्या तक्रारी काही भागातील नागरिकांनी केल्या. तसेच गिरीपेठ भागात धोकादायक झाडे कापण्याच्या तक्रारींवर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
बाजीप्रभूनगर, जयनगर पांढराबोडी या भागात गडरलाईन फुटल्यामुळे पाणी वर्षभरापासून रस्त्यावर वाहत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. यावर सात दिवसात याप्रकरणी कारवाई करण्याचे प्रशासनाला सांगण्यात आले. रामदासपेठ लेंड्रा पार्क येथे गडरलाईनच नाही. तसेच अनधिकृत घर तोडण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली.
डॉ. आंबेडकर भवनाची दुर्दशा
अंबाझरी उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उभारण्यात आले आहे. या भवनाला विशेष महत्त्त्व आहे. येथे सभा व कार्यक्रम होत होते. आज या भवनाला खिडक्या, दारे नाहीत. भवनाची दुर्दशा झाल्याचे भीमराव फुसे यांनी निदर्शनास आणले. या भवनासाठी २५ लाखांचा निधी उपलब्ध करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.
अवैध धंद्यांवर कारवाई करा
बाजीप्रभूनगर, पांढराबोडी या भागात दिवसा दारू पिऊन गोंधळ घालण्याचा प्रकार सुरू असतो तसेच दिवसा जुगार खेळला जात आहे. यावर पोलीस विभाग कोणतीही कारवाई करीत नाही. यामुळे परिसरातील महिला व तरुणी असुरक्षित झाल्या आहेत. या भागातील साफसफाईही केली जात नाही, याकडेही पालकमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले. बाजीप्रभूनगर नागरिक मंडळाने पांढराबोडी तलावाचे सौंदर्यीकरण अर्धवट असल्याकडे पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले. चार कोटी रुपये या तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी देण्यात आले होते. तो निधी कुठे गेला. सौंदर्यीकरणाऐवजी तलावात दारू पिणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणले. यावर पालकमंत्र्यांनी अवैध धंद्यावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
सुधाकर देशमुख व काँग्रेसच्या नगरसेवकांत झटापट
दाभा, मकरधोकडा भागातील विकास कामांचे आमदार सुधाकर देशमुख यांनी दोनदा भूमिपूजन केले. परंतु अद्याप रस्त्यांचे डांबरीकरण झालेले नाही, असा आरोप काँग्रेसच्या नगरसेवक दर्शनी धवड यांनी केला. नगरसेवक हरीश ग्वालबन्शी, कमलेश चौधरी यांनीही भूमिपूजन केल्यानंतरही कामे होत नसल्याचा आरोप केला. त्यांच्या मदतीला व्यासपीठावर उपस्थित असलेले किशोर जिचकारसुद्धा खाली आले. या आरोपामुळे देशमुख चांगलेच संतापले. भूमिपूजन केलेली कामे झाली नसेल तर मी पदाचा राजीनामा देतो, नाही तर तुम्ही राजीनामा द्या, असे आव्हान दिले. परंतु नगरसेवक आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावरून देशमुख व नगरसेवकांत चांगलीच झटापट झाली. विकास क ामे करताना लोकप्रतिनिधी असूनही विचारात घेत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. तर देशमुख यांनी काँग्रेसचे नगरसेवक आपल्याला प्रभागातील विकास कामांच्या कार्यक्रमाला बोलावत नसल्याची भूमिका मांडली. नागरिकांनी नगसेवकांच्या भूमिकेचे समर्थन केले. आमदारांची चांगलीच कोंडी झाली. हा वाद शमल्यानंतर दाभा भागातील नागरिकांनी विकास कामांसंदर्भात तक्रार करताना आमदार आपल्या जवळच्या विशिष्ट व्यक्तीचे काम करीत असल्याचा आरोप केला. यावर मात्र देशमुख गप्पच होते.
प्रसिद्ध आर्टिस्ट विवेक रानडे व संजय सिंगलकर व कार्यकर्त्यांनी विविध १२ मुद्दे उपस्थित केले.