वीज बिलाचा चेक बाऊन्स झाल्यास ८८५ रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2021 11:15 AM2021-08-06T11:15:08+5:302021-08-06T11:16:11+5:30
Nagpur News विजेचे बिल भरण्यासाठी दिलेला चेक बाऊन्स होणार असेल तर आता सावधान! कारण अशा चेकवर यापुढे ८८५ रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विजेचे बिल भरण्यासाठी दिलेला चेक बाऊन्स होणार असेल तर आता सावधान! कारण अशा चेकवर यापुढे ८८५ रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. राज्यात दर महिन्यात सरासरीने १०,५०० चेक बाऊन्स होत असल्याने महावितरणने यासंदर्भात कडक धोरण स्वीकारण्याचे जाहीर केले आहे. अनेक ग्राहकांच्या बिलांच्या सामूहिक देयकासाठी दिलेला चेक बाऊन्स झाला असेल तर प्रत्येकाच्या बिलामध्ये हा दंड लावला जाणार आहे.
महावितरणच्या माहितीनुसार, ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करूनही राज्यातील ४.५१ लाख वीज ग्राहक चेकच्या माध्यमातूनच बिल भरत आहेत. यात सर्वाधिक १.०८ लाख ग्राहक पुणे परिमंडळातील आहेत. भांडुप परिमंडळात १.०४ लाख तर कल्याणमध्ये ७३ हजार ग्राहक आहेत. नाशिक, कोल्हापूर, बारामती तसेच नागपूर परिमंडळातही २४ ते २९ हजार ग्राहक या सुविधेचा उपयोग करीत आहेत. जर यातील चेक बाऊन्स झाल्यास प्रत्येक बिलात १८ टक्के जीएसटीसह ८८५ रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. यापूर्वी एप्रिल २०२० पर्यंत ३५० रुपयांची आकारणी केली जायची.
महावितरणच्या मते, चेकवर चुकीची तारीख लिहिणे, खाडाखोड केल्यावर हस्ताक्षर न करणे, चुकीचे हस्ताक्षर करणे, खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसणे आदी चेक बाऊन्सची कारणे आहेत. चेक दिल्यावर पावती मिळत असली तरी चेक क्लीअर झाल्यावरच भुगतान पूर्ण झाल्याचे मानले जाईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी चेकऐवजी ऑनलाइन बिल भरण्यावर भर द्यावा, असे आवाहन केले आहे. क्रेडिट-डेबिट कार्ड, यूपीआई, भीम ॲप, इंटरनेट बँकिंग, मोबाइल वॉलेट, मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून बिल भरल्यास ०.२५ टक्के (जास्तीतजास्त ५०० रुपये) सूट देण्याची तरतूद आहे.
दर महिन्यात होतात १०,५०० चेक बाऊन्स
दर महिन्यात साधारणत: सरासरीने १०,५०० चेक बाऊन्स होतात, असा महावितरणचा दावा आहेत. यात नागपूर परिमंडळातील १,१०० चेक आहेत. याच प्रकारे पुणे परिमंडळात १,७५०, कल्याण १,७००, भांडुप १,५००, बारामती ९०० तसेच अन्य परिमंडळात ७० ते ८० ग्राहकांचे चेक बाऊन्स होत आहेत.
...