पेंचमधील वाघिणीच्या गळ्यात आढळला फास, वन्य प्राण्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 11:34 AM2022-01-28T11:34:43+5:302022-01-28T11:47:22+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये गळ्यात फास (सापळा) असलेल्या वाघिणीचे छायाचित्र आले आहे. यामुळे वनविभागात खळबळ उडाली असून वाघांची सुरक्षा आणि शिकाऱ्यांच्या सक्रियतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या नागलवाडी श्रेणीतील माईकेपार बीटमध्ये लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमधून छायाचित्रांची तपासणी करताना २६ जानेवारीला हा प्रकार लक्षात आला. येथे टी-४१ या वाघिणीच्या गळ्यात फास आढळून आला आहे. विशेष म्हणजे कॅमेरा ट्रॅपच्या ठिकाणापासून कृषी क्षेत्र अंदाजे एक किलोमीटर अंतरावर आहे.
या वाघिणीची अधिक माहिती मिळविण्यासाठी मागील कॅमेरा ट्रॅप रेकॉर्डचे विश्लेषण वनविभागाच्या पथकाने केले असता पश्चिम पेंच, सालेघाट आणि नागलवाडी भागातून ही वाघीण आली असल्याचे निदर्शनास आले. शोध घेण्यासाठी विभागाने अधिक कॅमेरा ट्रॅप्स लावले आहेत.
या वाघिणीचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या पथकाने जंगलातील पगमार्क शोधून माग काढण्याचा प्रयत्न केला. यासाठी एकूण नऊ गस्ती पथके तयार करण्यात आली आहेत. कॅमेरा ट्रॅपची संख्याही वाढविण्यात आली आहे.
गावकऱ्यांना सावधगिरीचा इशारा
वनविभागाने गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या आणि जंगलात न जाण्याच्या सूचना दिल्या आहे. परिसरात असलेल्या गावातील सरपंच, वन समित्यांचे अध्यक्ष, पोलीस पाटील यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला असून त्यावरून माहितीची आदानप्रदान केली जात आहे. प्रादेशिक नागपूर वनविभागाला सतर्क करण्यात आले आहे.
दुसरी घटना
गळ्यात फास घेऊन फिरणारी वाघीण दिसण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वरोरा-भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील जंगलात एक वाघीण गळ्यात फास असलेल्या स्थितीत कॅमेरा ट्रॅपमध्ये आढळून आली होती. तिच्या गळ्यातील फास कायम असताना ही दुसरी घटना पुढे आली आहे.