चक्क पेन्शनर महिला चालवत होती ‘सेक्स रॅकेट’; दोन महिलांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2022 09:05 PM2022-05-17T21:05:17+5:302022-05-17T21:05:55+5:30
Nagpur News हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने भंडाफोड केला.
नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने भंडाफोड केला. यावेळी टाकण्यात आलेल्या धाडीत दोन महिलांची सुटका करण्यात आली, तर सूत्रधार महिलेला ताब्यात घेण्यात आले. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी महिलेला नियमितपणे पतीची पेन्शन देखील मिळत असल्याची बाब समोर आली.
नरसाळा मार्ग येथील संत ज्ञानेश्वर नगरात रेखा ऊर्फ अनिता पाचपोर ही महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देहव्यापाराचे रॅकेट चालविते अशी टीप मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला व डमी ग्राहक पाठविला. त्याने सिग्नल देताच पोलिसांनी धाड टाकली व दोन मुलींची सुटका केली. सूत्रधार महिलेला ताब्यात घेण्यात आले. रेखा मूळची अमरावतीची असून तिला पतीची पेन्शन मिळते. रेखाला विवाहित मुलगा व मुलगी असून ते वेगळ्या ठिकाणी राहतात व रेखा घरात एकटीच राहते.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखाला यापूर्वीही असे रॅकेट चालविताना पकडण्यात आले आहे. गरीब व गरजू महिला व मुलींना जाळ्यात ओढून ती त्यांना देहव्यापारात ढकलायची. तिच्या स्वत:च्या घरीच हा प्रकार चालायचा. रेखाच्या तावडीतून २७ आणि ४५ वर्षीय महिलांची सुटका करण्यात आली आहे. दोघींच्याही पतींचा मृत्यू झाला आहे. रेखा ग्राहकाकडून मिळणाऱ्या रकमेपैकी निम्मी रक्कम पीडित महिलांना देत असे.
हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) चिन्मय पंडित, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्यासमवेत संतोष जाधव, संदीप चंगोले, राशीद शेख, भूषण झाडे, चेतन गेडाम, लक्ष्मण चौरे, सुधीर तिवारी, प्रतिमा मेश्राम यांनी ही कारवाई केली.
आठवड्याभरात सापडले दुसरे ‘रॅकेट’
आठड्याभरात हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या आवारात वेश्याव्यवसायाचे आणखी एक ‘रॅकेट’ उघडकीस आले आहे. या कारवाईतून परिसरात वेश्याव्यवसायाचे अड्डे असल्याचे उघड झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही काळापूर्वी डीबीमध्ये समाविष्ट झालेल्या एका कर्मचाऱ्याची वेश्याव्यवसायाच्या अड्ड्यांमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. या कर्मचाऱ्याला तीन महिन्यांपूर्वी डीबीमधून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी नोकरी सोडण्याची वेळ आली होती. मात्र, अलीकडे अधिकाऱ्याला विश्वासात घेऊन त्याने पुन्हा डीबीमध्ये जागा मिळवली.