नागपुरात पेन्शनर्सला बँकांच्या असहकार्याचा बसतोय फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 10:53 AM2018-05-23T10:53:52+5:302018-05-23T10:54:05+5:30
कर्मचारी भविष्य निधी नागपूर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १ लाख २४ हजार ५७९ पेन्शनर्स येतात. यापैकी १११६५ पेन्शनर्सची गेल्या काही महिन्या पेन्शन रोखण्यात आली आहे. याचे कारण की भविष्यनिधी कार्यालयाशी टायअप करणाऱ्या बँकांनी जीवन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचारी भविष्य निधी नागपूर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत १ लाख २४ हजार ५७९ पेन्शनर्स येतात. यापैकी १११६५ पेन्शनर्सची गेल्या काही महिन्या पेन्शन रोखण्यात आली आहे. याचे कारण की भविष्यनिधी कार्यालयाशी टायअप करणाऱ्या बँकांनी जीवन प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येत आहे. जीवन प्रमाणपत्रामुळे पेन्शनर्सची पेन्शन थांबू नये म्हणून भविष्य निधीच्या उमरेड रोडवरील क्षेत्रिय कार्यालयात जीवन प्रमाणपत्र देण्याची सोय करण्यात आली आहे. कार्यालयातील अधिकाºयांचे म्हणणे आहे की, एकुण पेन्शनधारकांपैकी १ लाख १३ हजार ४१४पेन्शनधारकांची पेन्शन सुरू करण्यात आली आहे. यातील ११,१६५ पेन्शनधारकांचे जीवन प्रमाणपत्र आले नसल्याने पेन्शन थांबविण्यात आली आहे.
भविष्य निर्वाह निधीची पेन्शन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी ‘जीवन प्रमाणपत्र’ भविष्य निधी कार्यालयाला सादर करावे लागते. केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निधीचे काम डिजिटल केले आहे. त्यामुळे भविष्य निधी कार्यालयाचा बँकांशी होणारा व्यवहार आता आॅनलाईन झाला आहे. कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाशी स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, एक्सीस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व सेंट्रल बँक आॅफ इंडिया या बँका जुळल्या आहेत. गावाखेड्यातील सेवानिवृत्त कर्मचारी या बँकेच्या त्या-त्या जिल्ह्यातील शाखेतून पेन्शन प्राप्त करतात. भविष्य निर्वाह निधी कार्यालयाने कर्मचाऱ्यांच्या जीवन प्रमाणपत्रासाठी आधार लिंक केले आहे. कर्मचाऱ्यांचा आधार नंबर लिंक झाल्यावर कर्मचाऱ्यांना जीवनप्रमाणपत्र मिळते. या प्रमाणपत्रासाठी भविष्य निधीच्या केंद्रीय कार्यालयाने प्रत्येक बँकेला त्यासाठी सेटअप तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु बहुतांश बँकांनी सेटअप लावले नाही. बँकांनी आपली जबाबदारी झटकल्याने, कर्मचाऱ्यांची चांगलीच ओरड होत होती. त्यामुळे भविष्य निधी कार्यालयाने नागपुरातील क्षेत्रिय कार्यालयात जीवन प्रमाणपत्राचा सेटअप लावला. त्यामुळे जीवन प्रमाणपत्रासाठी गडचिरोलीहून कर्मचाऱ्यांना नागपुरातील भविष्य निधीच्या कार्यालयात यावे लागत आहे. जानेवारी २०१८ पासून कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद केल्याने कर्मचाऱ्यांची चांगलीच पायपीट होत आहे.
जीवन प्रमाणपत्रासाठी तिसरी चक्कर आहे
भंडारा जिल्ह्यातील आत्मराम खोडे आज भविष्य निधीच्या कार्यालयात जीवन प्रमाणपत्रासाठी आले होते. पहिल्या वेळी ते आले तेव्हा गर्दी इतकी होती की प्रमाणपत्र मिळू शक ले नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा कागदपत्र घेऊन आलो, तेव्हा गर्दीमुळे कामकाजाची वेळ संपली होती. आता ही तिसरी चक्कर आहे. १००० रुपयांच्या पेन्शनसाठी ज्येष्ठ नागरिकांना ही धावपळ असह्य होत आहे.
नागपूर क्षेत्रीय कार्यालयात १,२४, ५७९ पेन्शनधारक आहे. त्यापैकी १,१३,४१४ कर्मचाऱ्यांनी जीवनप्रमाणपत्र सादर केल्याने त्यांची पेन्शन सुरू झाली आहे. अजूनही १११६५ कर्मचारी आलेले नाहीत. मुळात बँकांनी जिल्हास्तरावर जर जीवनप्रमाणपत्रासाठी सेटअप लावले असते, तर कर्मचाऱ्यांची पेन्शन थाबंविण्याची गरज नसती. हे काम बँकेचे होते. त्यासाठी आम्ही त्यांना कमिशनही देत होतो. परंतु त्यांच्याकडून सहकार्य मिळाले नाही. आम्ही बँकांना तीनवेळा अर्जदेखील केला. त्यांना आठवणसुद्धा करून दिली. तरीदेखील बँकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
- जी.एम. कहू, क्षेत्रीय पी.एफ. आयुक्त
जीवन प्रमाणपत्र आधार कार्डशी लिंक के ल्यानंतरसुद्धा काही त्रुटी निघत आहे. वृद्धापकाळामुळे बोटांचे ठसे मॅच होत नाही. त्यामुळे अनेकांची पेन्शन थांबली आहे. कर्मचारी भविष्य निधीच्या एकाच कार्यालयात हे प्रमाणपत्र उपलब्ध होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. यासंदर्भात आम्ही भविष्य निर्वाह निधीच्या आयुक्तांना निवेदनसुद्धा दिले आहे. परंतु अद्यापही अनेक पेन्शनधारकांची पेन्शन सुरळीत झाली नाही.
प्रकाश पाठक, महासचिव,
निवृत्त कर्मचारी , समन्वय समिती
अंगठ्याचे ठसे जुळत नाही
कर्मचाऱ्यांना जीवन प्रमाणपत्रासाठी आधार लिंक करावे लागत आहे. त्यासाठी आधार कार्डचा नंबर, बँकेचे पासबुक व मोबाईल क्रमांकाची आवश्यकता आहे. आधार लिंक करताना काही वयोवृद्धांचे अंगठ्याचे ठसे जुळत नाही. आधार कार्ड व भविष्य निधीच्या रेकॉर्डवर कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे नाव आहे. यासारख्यासुद्धा काही तक्रारीमुळे पेन्शन थांबलेली आहे. ज्या कर्मचाऱ्यांचे अंगठ्याचे ठसे जुळत नाही, त्यांच्याकडून लेखी घेऊन त्यांची पेन्शन क्लिअर करीत आहोत.