"लोकंच संविधानिक लोकशाही जिवंत ठेवू शकतात"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 05:43 PM2024-02-02T17:43:40+5:302024-02-02T17:44:00+5:30
प्रा. देविदास घोडेस्वार : संविधान अमृत महोत्सव व्याख्यानमाला.
नागपूर : एखाद्या व्यक्तीच्या, नेत्याच्या किंवा पक्षाच्या प्रतिष्ठेपेक्षा देशाची प्रतिष्ठा महत्त्वाची असते. त्यासाठी द्वेष, भेदभाव बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. वेळ आणि परिस्थिती अनुकूल असेल तर कोणतीही शक्ती आपल्याला एकत्र येण्यापासून रोखू शकत नाही. या देशातील लोकच संविधान-लोकशाही जिवंत ठेवू शकतात त्यामुळे नागरिकांनीच यासाठी प्रयत्न करायला हवे, असे प्रतिपाद संविधानाचे अभ्यासक प्रा. देविदास घोडेस्वार यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव व संविधान अमृत महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास व विचारधारा विभागातर्फे अमरावती रोडवरील दीक्षांत सभागृहात 'संविधान निर्मितीची प्रक्रिया आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या विषयावरील व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. विभागातर्फे वर्षभरात अशी ७५ व्याख्याने होणार आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्य विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ.शामराव कोरेटी होते.
प्रा. देविदास घोडेस्वार म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान सभेला येण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसने आपली सर्व ताकद लावली होती. त्यांचा मुंबईकडून पराभव झाला. बंगालमधून जोगेंद्रनाथ मंडल यांच्या प्रयत्नाने ते विजयी झाले. मुंबईतील काँग्रेस सदस्य जयकर यांच्या रिक्त झालेल्या जागेवरून त्यांना बिनविरोध निवडून आणणे काँग्रेसला भाग पडले. कारण संविधानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आवश्यक झाले होते. पं. जवाहरलाल नेहरूंनी संविधान कसे असावे यासाठी ८ मुद्द्यांवर प्रस्ताव मांडला होता. यावर चर्चा सुरू झाल्यावर प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बोलण्याची संधी देण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र कसे असावे याची संपूर्ण मांडणी केली. ते म्हणाले की, प्रस्तावात फक्त हक्क नमूद केले आहेत, परंतु त्यांच्या संरक्षणाची हमी दिलेली नाही. जेव्हा संरक्षणाची हमी दिली जाईल तेव्हाच अधिकार यशस्वी होतील. हा देश आणि राष्ट्र आपले आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. देशाला एकसंध ठेवायचे असेल, तर बहुमताच्या जोरावर निर्णय घेण्याऐवजी संवादातून निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी स्पष्ट केले असल्याचे घोडेस्वार म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभाग प्रमुख डॉ.अविनाश फुलझेले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला.