दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : चंद्रशेखर बावनकुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2019 10:53 PM2019-05-02T22:53:52+5:302019-05-02T23:03:28+5:30
अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.
ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन करून सशस्त्र पोलीस दलाच्या पथसंचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना चंद्र्रशेखर बावनकुळे बोलत होते.
विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काटोल, नरखेड या भागात लोकसहभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शेतकरी उद्योजक तसेच विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कामगार बंधूंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच साजरा झाला असून, जनतेने लोकशाहीच्या या उत्सवामध्ये उत्साहात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अभिनंदन केले.
यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खा. डॉ. विकास महात्मे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि जिल्हा व पोलीस प्रशासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.
पोलीस पथकाच्या परेडने वेधले लक्ष
यावेळी परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस पथकाचे संचलन झाले. त्यांच्यासोबत सेकंड इन कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक प्रधान तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ चे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोर्ला, गडचिरोलीचे दिलीप तरारे, गोंदियाचे अरुण धुळसे, नागपूर शहर सशस्त्र पोलीस दल शशिकांत नागरगोजे, नागपूर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, लोहमार्ग पोलिसचे विनोद तिवारी, नागपूर शहर (महिला) पोलिसचे उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाचे घनश्याम दुजे, वाहतूक शाखेचे जितेंद्र्र ठाकूर, होमगार्ड जिल्हा समादेशकचे प्लाटून कमांडर रोशन गजभिये आणि संजीवनी बोदेले, बँड पथकाचे प्रदीप लोखंडे, रामू ससाने, संजय पंचभुते, चंद्रकांत मानवटकर, सुरेश सनेश्वर, श्वान पथक ‘जीवा’सह शिवशंकर जोशी, ‘वज्र’चे वीरेनशहा खंडाते, बॉम्ब नाशक पथकाचे विजय मैंद, वरुण वॉटर कॅनॉनचे संतोष श्रीवास, अग्निशमन दलाचे विनोद जाधव आणि सामान्य रुग्णालयाच्या डॉ. रोहिना शेख यांचा पथसंचलनात सहभाग होता.