लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 12:15 AM2018-07-10T00:15:34+5:302018-07-10T00:16:27+5:30

लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर्शन करावे लागले. त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर उमेदवार निवडूनच येत नाही, असे रोखठोक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.

People do not vote without "Lakshmidarshan" | लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत

लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत

Next
ठळक मुद्देनीतेश राणे रोखठोक : यशवंत महोत्सवात युवा आमदारांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर्शन करावे लागले. त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर उमेदवार निवडूनच येत नाही, असे रोखठोक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्र नागपूरतर्फे आयोजित यशवंत महोत्सवात सोमवारी ‘युवा आमदारांशी युवकांचा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार निरंजन डावखरे व आमदार जगदीश महाडिक यांच्यासह अध्यक्षस्थानी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, गिरीश गांधी, समीर सराफ, डॉ. प्रदीप विटाळकर, प्रेम लुनावत उपस्थित होते. नीतेश राणे पुढे म्हणाले की, राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. पूर्वी कार्यकर्ते प्रेमापोटी निष्ठेने कार्य करायचे. मात्र आज निष्ठा फुकट मिळत नाही. हल्ली निष्ठेलाही प्राईस टॅग असते, हे वास्तव मान्य करावे लागेल. जनतेला त्यांच्यानुसार त्यांचा लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व सरकार मिळत असते. एखाद्याला त्यांचा नेता किंवा सरकार आवडत नसेल तर त्यास नाकारण्याचे अधिकारही त्यांना आहेत. एका क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील एखाद्यावर टीका करणे सहन होत नाही. मात्र राजकारणात तसे होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देश व लोकप्रतिनिधी घडविणारी जनताच असते. आम्ही प्रामाणिकपणे हे राज्य घडविण्याचा प्रयत्न करू व जनतेनेही त्यांचे कार्य योग्यपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
डॉ. आशिष देशमुख म्हणाले, हल्लीच्या राजकारणात मूल्य, नीतीमत्ता व समर्पण राहिले नसल्याची टीका सातत्याने होते व राजकीय व्यक्तींना संशयातून पाहिले जाते. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखा आदर व सन्मान मिळत नसल्याचे सांगत, या घसरणीसाठी राजकारण कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही घसरण रोखण्यासाठी स्वार्थ सोडून नीतिमूल्याने कार्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. युवा आमदारांना तरुणांशी जुळून कार्य करावे लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
एका काळात चित्रपटात खलपात्र म्हणून राजकीय व्यक्तींना रंगविण्यात आल्यानेही जनतेमध्ये नकारात्मकता निर्माण झाल्याची भावना जगदीश महाडिक यांनी व्यक्त केली. जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद न मानणाऱ्या युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहन त्यांनी केले. निरंजन डावखरे म्हणाले की, आज विधानसभेप्रमाणे परिषदेतही युवा आमदार येत असून ही परिस्थिती चांगली आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून युवक वेगवान झाला आहे. मात्र त्यांच्यात सहनशीलता कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाज आणि देश युवकांकडे अपेक्षेने बघतो तसे युवा लोकप्रतिनिधीकडेही बघतो. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय विचार व्यक्त करताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित आणि पाच वर्षे पारतंत्र्यात राहणारी व्यवस्था झाल्याची खंत व्यक्त केली. तरुण आमदारांनी नीतीमूल्याच्या राजकारणातून ही परिस्थिती बदलावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी व संचालन निशिकांत काशीकर यांनी केले.

 विदर्भ का हवा आणि का नको?
हा प्रश्न एका तरुणाने डॉ. देशमुख व नीतेश राणे यांना विचारला. यावर राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भाचे आहेत, पावसाळी अधिवेशन विदर्भात झाले असताना वेगळा विदर्भ का हवा, असा सवाल राणे यांनी केला. ही जनतेची नसून केवळ मूठभर लोकांची मागणी असल्याची टीका त्यांनी केली. यावर डॉ. देशमुख यांनी छोटी राज्ये प्रगतिशील आहेत, ही भूमिका मांडत, वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी असल्याचे उत्तर दिले. नाणार प्रकल्पासाठी समुद्राची आवश्यकता असते, असे बोलणाऱ्यांना विधिमंडळाच्या पहिल्या दिवशीचा फोटो दाखवावा, अशी उपरोधिक टीका राणे यांनी केली.

 

Web Title: People do not vote without "Lakshmidarshan"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.