इथं माणसं राहतात, शेळ्यामेंढ्या नव्हे! एक वस्ती अशीही... आधार कार्ड, जातीचे दाखले नाहीत, पण व्होटिंग कार्ड आहे
By मंगेश व्यवहारे | Published: August 3, 2023 02:10 PM2023-08-03T14:10:15+5:302023-08-03T14:12:03+5:30
घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे दोन हजार लोकं राहतात.
मंगेश व्यवहारे/विशाल महाकाळकर
नागपूर : एक वस्ती अशीही... जेथे ना रस्ते पोहोचले, ना पिण्यासाठी पाणी. वस्तीत व्होटिंग कार्ड सर्वांकडे आहे. मात्र आधार कार्ड अन् जातीचे दाखले नाहीत. दक्षिण नागपुरातील या वस्तीचे नाव आहे सिद्धेश्वरीनगर झोपडपट्टी.
घाणीतील बोअरवेलमधून लोक पिण्याचे पाणी भरतात. या दूषित पाण्यामुळे आजारांचा विळखा येथे पाचवीलाच पुजला आहे. येथील ३०० झोपड्यांमध्ये सुमारे दोन हजार लोकं राहतात. बहुतांश लोक गोंड समाजाचे आहेत. पावसाने घराघरांत पाणी शिरले. त्यामुळे संसार उघड्यावर आला होता. ‘लोकमत’च्या चमूने वस्तीला भेट देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
- मुलांची नावे शाळेत आहेत; पण त्यांना शाळेचे नावही सांगता आले नाही.
- दवाखाना, शाळा नाही, खड्डे खणण्याची कामे तरुण करतात.
- काही महिन्यांपूर्वी एकाचा उपासमारीने मृत्यूही झाल्याचे लोकांनी सांगितले.
- ज्येष्ठ मंडळींकडे जुने रेशनकार्ड आहे. तरुणांकडे जन्मदाखले नाहीत.
- यांच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाही; त्यामुळे योजनांचा लाभ नाही.
लोक सांगतात, आम्हाला टँकरचे पाणी नाही
वस्तीपर्यंत टँकर येतात; पण आम्हाला पाणी मिळत नाही. टँकरचे पाणी तुमच्या वस्तीसाठी नसल्याचे सांगितले जाते.
येथे पाच बोअरवेलपैकी तीन बंद आहेत. २० सार्वजनिक शौचालये आहेत; पण ती दोन हजार लोकवस्तीसाठी अपुरी आहेत.
निवडणुकीत वस्तीपर्यंत गाड्या येऊन लोकांना मतदानासाठी नेले जाते. आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी नंतर फिरकत नाहीत.