Prashant Kishore : विदर्भवाद्यांनी ‘पीके’कडून धडे घ्यायचे का ?
By कमलेश वानखेडे | Published: September 16, 2022 04:12 PM2022-09-16T16:12:38+5:302022-09-16T16:48:24+5:30
प्रशांत किशोर विदर्भातील नेत्यांसोबत करणार बैठक
नागपूर :विदर्भाच्या चळवळीला पुन्हा गती देण्यासाठी आणि आंदोलनाची रणनीती ठरवण्यासाठी राजकीय रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे प्रशांत किशोर (पीके) यांची मदत घेण्यात येणार आहे.
येत्या मंगळवारी ते नागपुरात विदर्भ चळवळीतील विविध नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यामुळे मंद पडलेल्या चळवळीला गती मिळेल, या आशेने काही विदर्भवादी सुखावले आहेत; परंतु विदर्भाच्या चळवळीत ज्यांनी आपली हयात घालवली. जे आजही चळवळीशी एकनिष्ठ आहेत, ज्यांनी भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या काळातील विदर्भ आंदोलनाची ताकद अनुभवली व त्यांच्या तालमीत घडले अशा कार्यकर्त्यांनाही आता आंदोलन कसे करावे, याचे धडे कुणी बाहेरची व्यक्ती देईल, हे विदर्भवाद्यांना पचनी पडलेले दिसत नाही. विदर्भ चळवळीचा झेंडा आम्ही खांद्यावर घेऊन राबायचे आणि बाहेरच्याने येऊन एका दिवसात ज्ञान वाटून जायचे, असं कसं होईल, असा सूरही काही विदर्भवाद्यांमध्ये दिसून येत आहे.
प्रशांत किशोर आखणार विदर्भ चळवळीची रणनिती; २८ सप्टेंबरला नागपुरात भूमिका जाहीर करणार
विदर्भ सर्वेक्षणाचा अहवाल मांडणार
प्रशांत किशोर यांच्या आयपॅक या संस्थेतर्फे गेली दोन महिने विदर्भातील एकूणच परिस्थिचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात समोर आलेले तथ्य ते या दौऱ्यात विदर्भवादी नेत्यांच्या समोर मांडणार आहेत. त्यांचा हा अहवाल विदर्भाच्या चळवळीसाठी पोषक असे दस्तावेज ठरेल, असा दावा केला जात आहे.