२१ दिवस लॉकडाऊनच्या घोषणेनंतर जीवनावश्यक वस्तुंसाठी नागपुरात लोकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:07 PM2020-03-24T22:07:30+5:302020-03-25T00:54:24+5:30
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज मंगळवारी देशभरात २१ दिवसाचा ‘लॉकडाऊन’ घोषित करताच जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांची धावपळ उडाली. लोकांनी कर्फ्यूला न जुमानता दुकानांमध्ये गर्दी केली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य शासनातर्फे अगोदरच राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. ही संचारबंदी येत्या ३१ तारखेपर्यंत आहे. लोकांनी तेव्हापर्यंत सहकार्य करावे, असे शासनातर्र्फे सांगितले जात आहे. यातच जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही. त्या सुरू राहतील, असेही वारंवार सांगितले जात आहे. लोकांनीही आपले मन त्यासाठी तयार केले होते. यातच आज मंगळवारी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोनाशी असलेला हा लढा जिंकण्यासाठी आणखी २१ दिवस देशभरात लॉकडाऊन करण्यात येत असल्याची घोषणा केली. तसेच लोकांनी घरीच राहावे, बाहेर पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे आणखी महिनाभर घरीच राहायचे असल्याने लोकांनी जीवनावश्यक वस्तूसाठी धावपळ केली. शहरात अनेक भागांमध्ये लोकांनी किराणाच्या दुकानामध्ये गर्दी केल्याचे सांगितले जाते. लोकांनी कर्फ्यूलाही जुमानले नाही. किराणा दुकान, फळ, पालेभाज्या, मेडिकल दुकानात नागरिकांनी गर्दी केली.