वांजरावासीयांचा मूलभूत समस्यांसाठी लढा ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:08 AM2021-02-26T04:08:18+5:302021-02-26T04:08:18+5:30

नागपूर : उत्तर नागपुरातील वांजरा परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या भागात रस्त्याची अवस्था बिकट आहे. ...

The people of Vanjara fight for basic issues () | वांजरावासीयांचा मूलभूत समस्यांसाठी लढा ()

वांजरावासीयांचा मूलभूत समस्यांसाठी लढा ()

googlenewsNext

नागपूर : उत्तर नागपुरातील वांजरा परिसरात नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या भागात रस्त्याची अवस्था बिकट आहे. नागरिक पाणी, गडरलाईनसाख्या सुविधांपासून वंचित आहेत. निवडणुकीपूर्वी लोकप्रतिनिधी अनेक दावे करतात. परंतु निवडून आल्यानंतर ते नागरिकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवितात. त्यामुळे महानगरपालिकेने या भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची मागणी नूरीनगर, न्यू डायमंडनगर, शिवनगर, एकतानगर, बाबा दिवाण ले-आऊट, संतोषीनगर, बंधू सोसायटी, संयुक्त सोसायटी, करीमनगर, भाग्यलक्ष्मी सोसायटी येथील नागरिक करीत आहेत.

आठ दिवसातून एकदा मिळते पाणी

वांजरा परिसरात नळ नसल्यामुळे आजही या भागात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. आठ दिवसातून एकदा टँकरद्वारे नागरिकांना पाणी मिळते. यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे या भागात नळलाईनची व्यवस्था करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

वस्तीत राहतो अंधार

वांजरा भागात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी सर्वत्र अंधार पसरलेला असतो. या भागात गल्ली, चौक, रस्त्यावर सर्वत्र अंधार असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. अंधार राहत असल्यामुळे या भागात असामाजिक तत्त्व सक्रिय झाले आहेत. यामुळे नागरिकांची चिंता वाढली असून या भागात स्ट्रीट लाईटची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

अनधिकृत ले-आऊट सांगून टाळाटाळ

नागरिकांच्या मते, लोकप्रतिनिधीना मूलभूत सुविधांबाबत मागणी केल्यास ते अनधिकृत ले-आऊट असल्याचे सांगून विकास कामे करण्यास टाळाटाळ करतात. परंतु प्रशासनाने आपल्या पॉवर प्लान्टसाठी याच अनधिकृत ले-आऊटमधून पाईपलाईन टाकली. नागरिकांनी विकास कामांची मागणी केल्यास अनधिकृत ले-आऊटचे कारण सांगितले जाते. मात्र प्रशासनाचे काम पडल्यास ते अधिकृत ले-आऊट असल्याचे सांगतात. या दुहेरी भूमिकेमुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील ले-आऊटला नियमित करण्यासाठीही लोकप्रतिनिधी पुढाकार घेत नसल्याचे नागरिकांनी सांगितले.

अतिक्रमणामुळे रखडले डांबरीकरण

वांजरा भागातील सर्व ले-आऊटला वनदेवीनगर पुलापासून मुख्य रस्त्यापर्यंत जोडणाऱ्या भिलगाव मार्गावर आजही डांबरीकरण झालेले नाही. अतिक्रमणामुळे डांबरीकरण आणि रुंदीकरण रखडले आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत असल्याचे महापालिका सांगत आहे. परंतु रस्त्याच्या विकासात अतिक्रमण अडसर होत आहे. नागरिक प्लान्टच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. अनेक ले-आऊटमध्ये प्लॉट दोनवेळा विकण्यात आले आहेत. परंतु प्रशासनाला नागरिकांच्या समस्येशी काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. अनेक ले-आऊटमध्ये असामाजिक तत्त्वांना हाताशी धरून प्लॉटवर ताबा मिळविण्यात येत असल्याची स्थिती आहे.

समस्यांकडे दुर्लक्ष

‘नगरसेवक ते पालकमंत्री सर्वांना निवेदन देऊन या भागातील समस्या मांडण्यात आल्या आहेत. परंतु समस्या लोकप्रतिनिधी हे ले-आऊट अनधिकृत असल्याचे सांगतात. प्रशासनाने अनधिकृत ले-आऊटमधून आपल्या प्लान्टसाठी पाईपलाईन टाकली आहे. आजही येथे रस्ते, गडरलाईन, पाणी, स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाही.’

- साजीद अली, नागरिक

गडरलाईन, पाणी, रस्त्याची समस्या दूर व्हावी

‘गडरलाईन, रस्ते आणि पाण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. परिसरात ग्रंथालय नाही. सुविधांसाठी नगरसेवक पुढाकार घेत नाहीत.’

- राज शर्मा, नागरिक

खरेदी-विक्रीत येतात अडचणी

‘जमिनीच्या खरेदी-विक्रीत अनेक अडचणी येतात. परंतु नागरिकांच्या समस्या लोकप्रतिनिधी ऐकून घेत नाहीत. मूलभूत समस्या दूर करून नागरिकांना खरेदी-विक्रीत येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज आहे.’

- मुबारक खान, नागरिक

मूलभूत समस्या दूर कराव्यात

‘वांजरा परिसरात नियमित सफाई करण्यात येत नाही. कूपनलिकांची अवस्था बिकट आहे. रस्ते खराब झाले आहेत. गडरलाईन नसल्यामुळे सर्वत्र घाण पसरलेली असते. त्यामुळे नागरिकांच्या समस्या दूर करण्याची गरज आहे. ’

- कदम पुरी, नागरिक

पाण्याची टंचाई दूर करावी

‘गडरलाईन नसल्यामुळे रिकाम्या प्लॉटमध्ये पाणी साचून दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव होतो. लहान मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. आठवड्यातून एकवेळा पाणी मिळते. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करावी लागते. महापालिकेने या भागात नळलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.’

- रजनी राठोड, महिला

अनधिकृत वस्तीत मतदानही मागू नये

‘वांजरा भागात उद्यान नाही. येथे नियमित सफाई करण्यात येत नाही. पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. नगरसेवक हा अनधिकृत भाग असल्याचे सांगून विकास करण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे अनधिकृत वस्तीत मतदान मागण्यासाठी लोकप्रतिनिधींनी येऊ नये.’

- शबनम खान, महिला

..............

Web Title: The people of Vanjara fight for basic issues ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.